अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा; पुण्यात राष्ट्रवादीचे "जोडे मारो आंदोलन"
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2022 07:32 PM2022-11-07T19:32:54+5:302022-11-07T19:33:04+5:30
महिलांबाबत अपमानकारक विधान करणाऱ्या अब्दुल सत्तार यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा घ्यावा
पुणे: खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी अपशब्द वापरत टीका केली. या विरोधात पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अब्दुल सत्तार यांच्या विरोधात राणी लक्ष्मीबाई पुतळा ,जंगली महाराज रोड येथे जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. सुप्रियाताई सुळे यांची कृषिमंत्र्यांनी व्यक्तिगत माफी मागावी व महिलांबाबत अपमानकारक विधान करणाऱ्या मंत्र्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी बोलताना शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले , "महिलांच्या बद्दल आदर नसणारी लोक आज शिवरायांच्या महाराष्ट्राचा गाडा हाकत आहे ही, आपल्या सर्वांसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्षामध्ये महाराष्ट्र राज्याच्या राजकीय संस्कृतीचा एक धागा गेली अनेक वर्षे जपण्यात आलेला आहे. यामध्ये विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्ष यांनी गेली अनेक वर्षे राजकारणापलीकडे जाऊन सौहार्दाचे वातावरण जपले आहे. अशामध्ये आपल्या मंत्रीमंडळातील मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याविषयी केलेले वक्तव्य अत्यंत अशोभनीय व असंस्कृत आहे. याचा आम्ही तीव्र निषेध करतो. खासदार सुप्रियाताई सुळे यांचा अपमान म्हणजे राज्यातील तमाम महिलांचा अपमान आहे. त्यामुळे राज्य सरकारने तात्काळ अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी करावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोषाला सामोरे जावे लागेल! अब्दुल सत्तार सारख्या बेताल वक्तव्य करत महाराष्ट्रातील वातावरण बिघडवणाऱ्या वाचाळवीरांचा बंदोबस्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी नक्की करतील असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.