Video: भाजपची पोपटपंची करणाऱ्या विचित्रा वाघचा धिक्कार असो; पुण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 01:45 PM2022-04-13T13:45:45+5:302022-04-13T13:51:02+5:30
एका मुलीच्या भावनांचा गैरवापर करत स्वतः ची राजकीय पोळी भाजणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने राणी लक्ष्मीबाई पुतळ्यासमोर निषेध आंदोलन करण्यात आले
पुणे : एका मुलीच्या भावनांचा गैरवापर करत स्वतः ची राजकीय पोळी भाजणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने राणी लक्ष्मीबाई पुतळ्यासमोर निषेध आंदोलन करण्यात आले.
गेल्या दोन महिन्यांपासून भाजप नेत्या चित्रा वाघ या माध्यमांसमोर वारंवार काही नेत्यांवर बलात्काराचे आरोप करत एका पीडित मुलीची कथित व्यथा समाज माध्यमांमध्ये सांगत होत्या. या सर्व काळात चित्रा वाघ यांनी अतिशय घाणेरडे आरोप करत संबंधित नेत्याबाबत अनेक वक्तव्ये केली. अखेर या प्रकरणातील मुलीने काल स्वतः पत्रकार बांधवांना भेटून हे सर्व आरोप खोटे असून चित्रा वाघ यांनी जाणीवपूर्वक हे सर्व आरोप करण्यास भाग पाडले असे सांगितले. हा प्रकार अत्यंत संतापजनक असून आपले राजकीय पोळी भाजण्यासाठी चित्रा वाघ यांनी या मुलीच्या भावनांचा निव्वळ वापर केला. राजकारणात दावे-प्रतिदावे आरोप-प्रत्यारोप करायचे असतात, परंतु हे आरोप प्रत्यारोप करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला बलात्कारासारख्या गुन्ह्यात अडकवणे, एखाद्या मुलीच्या भावनांशी खेळणे हे खरोखर घृणास्पद असून, चित्रा वाघ यांच्या या वर्तणुकीमुळे सर्वत्र संतापाची लाट असल्याचे आंदोलनकर्त्यांनी यावेळी सांगितले.
पुण्यात चित्रा वाघ यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन #Pune#NCPpic.twitter.com/DwgJZu7E2E
— Lokmat (@lokmat) April 13, 2022
भारतीय जनता पार्टीची हीच संस्कृती आहे का....?
ज्या महाराष्ट्र राज्यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पहिल्या शिक्षिका फातीमा, पहिल्या डॉक्टर आनंदीबाई या सर्व थोर महिलांची परंपरा या महाराष्ट्राला आहे, अशा या महाराष्ट्राच्या भूमीत एक महिला दुसऱ्या महिलेचा वापर स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी करते यापेक्षा दुसरे दुर्दैव कुठले असेल. या ज्या राजकीय पक्षाच्या सदस्य आहेत, त्या भारतीय जनता पार्टीची हीच संस्कृती आहे का....? असा सवाल राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या शहराध्यक्षा सुषमा सातपुते यांनी यावेळी विचारला. तसेच अशा प्रकारे महिलांच्या भावनांशी खेळणाऱ्या चित्रा वाघ यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी देखील राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने या आंदोलन प्रसंगी करण्यात आली.