Baramati Lok Sabha: बारामतीची लढाई सोपी करण्यासाठी अजित पवारांची नवी खेळी; तटकरेंनी घेतली अनंत थोपटेंची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 05:22 PM2024-03-21T17:22:44+5:302024-03-21T17:29:43+5:30
बारामती मतदारसंघात एका-एका मताला महत्त्व प्राप्त झालं असून सर्वपक्षीय नेत्यांकडून प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे.
NCP Sunil Tatkare ( Marathi News ) :बारामती लोकसभा मतदारसंघाकडे यंदा राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. कारण या मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या आणि सलग तीन वेळा खासदार असलेल्या सुप्रिया सुळे यांच्याविरोधात त्यांच्याच भावजय सुनेत्रा पवार या निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. तसंच महायुतीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेनेचे नेते व माजी मंत्री विजय शिवतारे हेदेखील बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल करण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर बारामती मतदारसंघात एका-एका मताला महत्त्व प्राप्त झालं असून सर्वपक्षीय नेत्यांकडून प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे. बारामती मतदारसंघात येणाऱ्या भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंत थोपटे यांना भेटण्यासाठी मागील काही दिवसांपासून नेत्यांची रीघ लागली आहे. अशातच आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही अनंत थोपटे यांची भेट घेत चर्चा केली आहे.
अनंत थोपटे यांचे पुत्र संग्राम थोपटे हे मागील काही वर्षांपासून भोर विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत. भोर आणि आजूबाजूच्या परिसरात थोपटे कुटुंबाचं मोठं राजकीय वलय आहे. त्यामुळे थोपटेंना आपल्या बाजूने वळवण्यासाठी सर्वपक्षीय राजकारण्यांचे प्रयत्न सुरू आहेत. काही आठवड्यांपूर्वी सुनेत्रा पवार यांनी अनंत थोपटे यांची भेट घेतली. त्यानंतर भोर येथील सभेनंतर शरद पवारही आपले राजकीय वितुष्ट विसरून थोपटे यांच्या भेटीसाठी गेले. बारामती मतदारसंघातून अपक्ष उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या विजय शिवतारे यांनीही नुकतीच अनंत थोपटेंची भेट घेत आशीर्वाद मागितले. त्यामुळे थोपटे हे नक्की कोणाला समर्थन देणार, याबाबतची चर्चा सुरू असतानाच आज सुनील तटकरेही त्यांच्या निवासस्थानी पोहोचले.
दरम्यान, अनंत थोपटे यांचे पुत्र संग्राम थोपटे हे काँग्रेसचे आमदार असल्याने महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून ते सुरुवातीपासूनच सुप्रिया सुळे यांचा सक्रियपणे प्रचार करत आहेत. त्यामुळे भोर-राजगड-मुळशी परिसरात आपल्याला फटका बसू शकतो, हे लक्षात घेत अजित पवार यांनीच सुनील तटकरेंना अनंत थोपटेंची भेट घेण्यासाठी पाठवल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर अनंत थोपटे आगामी काळात नेमकी काय भूमिका घेतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
शिवतारेंच्या भेटीनंतर काय म्हणाले होते अनंत थोपटे?
विजय शिवतारे यांनी अनंत थोपटे यांची भेट घेतल्यानंतर थोपटे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "शरद पवार शेवटपर्यंत माझ्या विरोधात होते. त्यावेळी दिल्ली माझ्यासोबत होती तरी देखील माझा पराभव झाला. तेव्हा माझा पराभव कसा झाला हे सर्वांनाच माहीत आहे. तरीदेखील मी शेवटपर्यंत काँग्रेस सोडली नाही. काही दिवसांपूर्वी शरद पवार मला भेटून गेले. त्यावेळी जुन्या आठवणी जागा झाल्या. बारामती लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आता शरद पवारांची मुलगी आणि अजित पवारांची पत्नी निवडणूक लढवत आहे. त्यांच्या विरोधात शिवतारे उभे आहेत. त्यामुळे कुणाला पाठिंबा द्यायचा याबद्दल अद्याप विचार केला नाही. विचार करून याबद्दल निर्णय घेणार आहे," असं अनंत थोपटे यांनी सांगितलं आहे.