राष्ट्रवादी, शिवसेनेने राखल्या आपापल्या ग्रामपंचायती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:11 AM2021-01-19T04:11:37+5:302021-01-19T04:11:37+5:30
घोडेगाव: आंबेगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींचा निकाल पहाता राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेला आपल्याकडे यापूर्वी असलेल्या ग्रामपंचायत राखण्यात यश आले. ...
घोडेगाव: आंबेगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींचा निकाल पहाता राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेला आपल्याकडे यापूर्वी असलेल्या ग्रामपंचायत राखण्यात यश आले. मंचर ग्रामपंचायतवर महाविकास आघाडीने सत्ता मिळवली. तर, महाविकास आघाडीचा झालेला प्रयोग अजून काही ठिकाणी यशस्वी ठरला.
आंबेगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींपैकी कारेगाव, चिंचोली, भराडी व साकोरे या चार ग्रामपंचायती यापूर्वी बिनविरोध झाल्या आहेत. तर उर्वरित २५ ग्रामपंचायतींमध्ये १७५जागेंसाठी ३६६ उमेदवार उभे होते. यामध्ये गावडेवाडी, पिंगळवाडी/लांडेवाडी, कोळवाडी/कोटमदरा, पिंपळगांव तर्फे महाळुंगे, लौकी, शिरदाळे, जवळे, काठापूर, शिंगवे, गिरवली, शेवाळवाडी, खडकवाडी, भागडी, एकलहरे, खडकी, पेठ, महाळुंगे पडवळ, वळती, थुगांव, काळेवाडी/दरेकरवाडी, रानमळा, धोंडमाळ/शिंदेवाडी, कोलदरा/गोनवडी,अवसरी खुर्द यांची मतमोजणी घोडेगाव येथील तहसील कायार्लयात झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांत अधिकारी सारंग कोडोलकर यांनी काम पाहिले.
आंबेगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या एकंदरीत निकालावर आम्ही समाधानी आहोत. तालुक्यात २९ पैकी १६ ग्रामपंचायती राष्ट्रवादीकडे आल्या, तर ८ ग्रामपंचायती शिवसेनेकडे राहिल्या व ५ ग्रामपंचायती स्थानिक पातळीवरील आघाड्यांमध्ये राहिल्या. महाळुंगे पडवळ जरी शिवसेनेकडे गेली असली तरी थुगांव, गावडेवाडी आमच्या कडे आली. मंचरप्रमाणे ज्या ठिकाणी महाविकास आघाडी लढली तेथे गावांचा फायदा झाला, प्रत्येक निवडणुकीत होणारे वादविवाद तंटे या निवडणुकीत झाले नाहीत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विष्णुकाका हिंगे यांनी सांगितले.
शिवसेनेने यापूर्वी आपल्याकडे असलेल्या ग्रामपंचायती टिकवून महाळुंगे पडवळ सारखी मोठी ग्रामपंचायत मिळवली. राष्ट्रवादीकडे सत्तास्थाने असतानाही शिवसेनेने चांगले यश मिळवीले, या निकालावर आम्ही समाधानी आहोत. मंचर ग्रामपंचायत मध्ये शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येवून १७ पैकी १६ जागा मिळवल्या. मंचर ग्रामपंचायतीमध्ये हे दोन्ही पक्ष एकत्र आल्याने गावाच्या विकासाला फायदा होईल, असे शिवसेना तालुका प्रमुख अरूण गिरे यांनी सांगितले.
आंबेगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींचा निकाल पहाता भाजपाचे मतदान वाढले आहे. यापूर्वी भाजपाचे उमेदवार मिळत नव्हते मात्र या निवडणुकीत आम्ही उमेदवार देऊ शकलो. गिरवली, पेठ, थुगांव, कारेगांव, चिंचोली या ग्रामपंचातयींमध्ये आम्ही भाजपाचे उमेदवार निवडून आणले आहेत. मंचर ग्रामपंचायतमध्ये आम्ही तीस टक्के मते मिळवली, यातील वाॅर्ड क्र.५ मध्ये चुरशीची लढत दिली अशी प्रतिक्रिया भाजपाचे तालुका अध्यक्ष डॉ.ताराचंद कराळे यांनी दिली.
मंचर मध्ये राष्टवादी व शिवसेनेची आघाडी म्हणजे 'हम तुम मिलके बाट खायेंगे' यासाठी एकत्र आलेले हे दोन्ही पक्ष आहेत. तालुक्यातील दोन मोठया नेत्यांच्या ताकदीमध्ये आमच्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळाली नाही. तसेच या दोघांच्या दबाव तंत्रामुळे आम्हाला उमेदवार मिळाले नाहीत. परंतु या परभावातून पुन्हा कामाला लागू व आंबेगाव तालुक्यात काँग्रेस आयचे स्थान बळकट करू, असे काँग्रेस आयचे तालुका अध्यक्ष राजू इनामदार यांनी सांगितले.
१८ घोडेगाव
तहसील कार्यालयाबाहेर मतमोजणीनंतर जल्लोष साजरा करताना कार्यकर्ते
१८ घोडेगाव १
गिरवली ता.आंबेगाव ग्रामपंचायतचे विजयी उमेदवार.