राष्ट्रवादी- भाजपामध्ये रंगतदार सामना
By admin | Published: November 17, 2016 04:17 AM2016-11-17T04:17:58+5:302016-11-17T04:17:58+5:30
स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाले तांबे, नगरसेविका मोहिनी देवकर असे दोन विद्यमान नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा परंपरागत मतदार असलेला भाग, तसेच
धनकवडी : स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाले तांबे, नगरसेविका मोहिनी देवकर असे दोन विद्यमान नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा परंपरागत मतदार असलेला भाग, तसेच आमदार भीमराव तापकीर, नगरसेविका वर्षा तापकीर यांचा असलेला जनसंपर्क प्रभाग ३९ मध्ये आहे. त्यामुळे प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपामध्ये थेट लढत होण्याची शक्यता या प्रभागात दिसून येणार आहे. त्याचबरोबर काँग्रेस, मनसे, शिवसेना या पक्षांकडूनही जोरदार संघटन बांधणी होताना दिसून येते.
प्रभाग क्रमांक ७४, तसेच प्रभाग ६९ व ७५ चा काही भाग समाविष्ट करून नवीन प्रभागरचनेत ३९ हा प्रभाग तयार करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक विशाल तांबे गेल्या दहा वर्षांपासून या प्रभागातून निवडून येत आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या नगरसेविका मोहिनी देवकर, भाजपाच्या वर्षा तापकीर या विद्यमान नगरसेविका या प्रभागातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक शिवलाल भोसले, काँग्रेसचे नगरसेवक अभिजित कदम, शिवसेनेच्या कल्पना थोरवे यांच्या प्रभागातील काही भाग या नव्या प्रभागात समाविष्ट झाला आहे. मात्र, ते दुसऱ्या प्रभागातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत.
सोसायट्या, बंगलो, गावठाण, झोपडपट्टी, वस्ती भाग असा दाट लोकवस्ती असलेला हा संमिश्र प्रभाग आहे. राष्ट्रवादीचा परंपरागत मतदार या भागात मोठ्या संख्येने आहे. त्याचबरोबर लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाच्या उमेदवारांनी या भागातून चांगली मते घेतलेली आहे.
प्रभागात पाच वर्षांत केलेली विकासकामे व मतदारांशी असलेला जनसंपर्क आदी बाबी निवडणुकीमध्ये महत्त्वाच्या ठरणार आहेत. गणेश मंडळे, नातीगोती, मित्र परिवार आदींवर उमेदवारांकडून भर दिला जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचण्याकडे लक्ष दिले जात आहे.
भाजपाच्या नगरसेविका वर्षा तापकीर यांच्यासह सरला माने, दीपक माने, नुकताच भाजपामध्ये प्रवेश केलेले गणेश भिंताडे यांच्याकडून पक्षाच्या संघटनात्मक कामावर भर दिला जात आहे.
मनसेच्या उमेदवार अश्विनी भागवत यांचा मागील वेळेस थोडया मतांनी पराभव झाला होता. त्याचबरोबर मनसेच्या चंद्रकांत गोगावले यांनीदेखील चांगली मते घेतली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून विशाल तांबे, बाळासाहेब धनकवडे, मोहिनी देवकर, संतोष फरांदे, किरण परदेशी, निकिता पवार, संजय पवार, गौरी जाधव, जयश्री पाटील, सुनील खेडेकर, सुवर्णा चव्हाण, किशोरी गोरे, प्रीती फरांदे, सुवर्णा चव्हाण, अर्चना लिमण इच्छुक आहेत.
भाजपाकडून वर्षा तापकीर, गणेश भिंताडे, दीपक माने, सरला दीपक माने, भूपेंद्र गोसावी, अप्पा धावने, विश्वास आहेर इच्छुक आहेत. मनसेकडून चंद्रकांत गोगावले, अश्विनी भागवत, ऋषी सुतार, ज्योती कोडे, मयूर भिसे इच्छुक आहेत.
शिवसेनेकडून सचिन धुमाळ, दीपक जाधव, प्रल्हाद कदम, योगेश पवार, प्रवीण खन्ना, नामदेव दामगुडे, रणजित शेलार, अनिल बटाने, किसन बोराटे, राजाभाऊ गवळी, रमेश शेलार, दत्ता घोणे, नेहा कुलकर्णी, काँग्रेसकडून दिलीप दोरगे, लता जगताप इच्छुक आहेत. त्याचबरोबर अनिल भोसले, मीना परदेशी हेदेखील इच्छुक आहेत.