०६ जुलैला राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक; शरद पवार म्हणाले, “नव्या लोकांना संधी द्यावी...”
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2023 01:52 PM2023-07-02T13:52:58+5:302023-07-02T13:53:31+5:30
Sharad Pawar Live: संघटनेत कुठे काही पुनर्रचना आहे का, यावर त्या बैठकीत चर्चा होईल, असे सूतोवाच शरद पवार यांनी केले.
Sharad Pawar Live: एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या घरी आमदार, खासदार, पदाधिकारी यांची एक महत्त्वाची बैठक झाल्याचे सांगितले जात आहे. अजित पवार यांनी पक्षात जबाबदारी मिळण्याबाबत इच्छा बोलून दाखवली होती. त्यानंतर अजित पवारांना प्रदेशाध्यक्ष करण्याबाबत ही बैठक असल्याचे सांगितले जात होते. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाष्य केले असून, याबाबत मला अधिक माहिती नाही. ०६ जुलै रोजी पक्षातील प्रमुख नेत्यांची महत्त्वाची बैठक असून, त्यात अनेक मुद्द्यांवर चर्चा होऊ शकेल, त्यात निर्णय घेतले जातील, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
या विषयी एक बैठक मीच बोलावली आहे आणि ती बैठक ६ जुलै रोजी होणार आहे. त्यात संघटनेत कुठे काही पुनर्रचना आहे का यावर चर्चा होईल. तसेच महिला, युवक, अल्पसंख्याक या शाखांमध्ये काही बदल करायचा का हाही विषय असेल. ६ जुलैच्या बैठकीत पक्षातील प्रमुख लोकांना मी निमंत्रित केले आहे, अशी माहिती शरद पवार यांनी दिली.
प्रमुख लोकांनी बसून विचार करावा या हेतूने ६ जुलैची बैठक बोलावली
अजित पवारांनी काही गोष्टी सुचवल्या होत्या. विशिष्ट वयापर्यंतच युवक काँग्रेसमध्ये काम केले जाते. मात्र, ते वय ओलांडूनही काही लोक काम करतात. असे न करता नव्या लोकांना संधी द्यावी, अशी त्यांची सूचना होती. त्या सगळ्याचा विचार प्रमुख लोकांनी बसून करावा या हेतूने ६ जुलैची बैठक बोलावली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. तसेच अजित पवारांच्या घरी झालेल्या बैठकीबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, मला नियोजन काय आहे माहिती नाही. पण विरोधी पक्षनेता म्हणून विधिमंडळाच्या सदस्यांची बैठक त्यांना बोलवण्याचा आधिकार आहे. म्हणून त्यांनी बैठीक बोलवली आहे. काय चर्चा होईल हे माहिती घेऊन सांगतो, असे शरद पवार म्हणाले.
दरम्यान, अजित पवार अलीकडेच दिल्लीला गेले होते. याबाबत बोलताना, फक्त अजित पवार नाही. मीही दिल्लीला गेलो होतो. जयंत पाटील पण गेले होते. अशोक पवार यांच्या मुलीच्या लग्नाला गेलो होतो, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.