भीमाशंकर कारखान्यावर दिलीप वळसे पाटलांचे निर्विवाद वर्चस्व

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2022 07:00 PM2022-10-17T19:00:39+5:302022-10-17T19:02:46+5:30

मतदान झालेल्या तीन जागा मोठ्या मताधिक्याने जिंकल्या आहेत...

ncp dilip walse Patil's undisputed dominance over the Bhimashankar sugar factory | भीमाशंकर कारखान्यावर दिलीप वळसे पाटलांचे निर्विवाद वर्चस्व

भीमाशंकर कारखान्यावर दिलीप वळसे पाटलांचे निर्विवाद वर्चस्व

Next

मंचर (पुणे) : पारगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत कारखान्याचे संस्थापक, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने सर्व २१ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. मतदान झालेल्या तीन जागा मोठ्या मताधिक्याने जिंकल्या आहेत. माजी अध्यक्ष देवदत्त निकम, दादाभाऊ पोखरकर, बाबासाहेब खालकर यांनी मोठ्या मताधिक्याने विजय संपादन केला आहे.

भीमाशंकर कारखान्याच्या २१ जागांसाठी निवडणूक पार पडली. शिवसेनेने उमेदवारी अर्ज भरले नाहीत. त्यामुळे १८ जागा बिनविरोध निवडल्या गेल्या. मात्र शिंगवे रांजणी गटात तुकाराम बाबुराव गावडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केली. त्यामुळे निवडणूक झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे देवदत्त निकम, दादाभाऊ पोखरकर, बाबासाहेब खालकर यांच्या पॅनल विरूद्ध अपक्ष गावडे अशी लढत झाली. १४ मतदान केंद्रांवर ३८.६२ टक्के मतदान झाले होते. आज मंचर येथील क्रीडा संकुलमध्ये मतमोजणी पार पडली. राष्ट्रवादीच्या पॅनलने एक हाती विजय संपादन केला आहे.

अपक्ष उमेदवार गावडे यांचा दारुण पराभव झाला आहे. देवदत्त निकम यांना ४१७४, दादाभाऊ पोखरकर यांना ३९६० तर बाबासाहेब खालकर यांना ३९०९ मते मिळाली. ८८ मतपत्रिका बाद झाल्या आहेत. दरम्यान, यापूर्वी १८ जागा बिनविरोध निवडल्या गेल्या आहेत. उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था गटात संस्थापक, माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील बिनविरोध निवडून आले आहेत.

मंचर महाळुंगे गट विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब बेंडे,अंकित जाधव, अरुण चासकर, घोडेगाव शिनोली गट अक्षय काळे, सिताराम लोहोट, बाजीराव बारवे, पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक निरगुडसर गट प्रदीप वळसे पाटील, रामचंद्र ढोबळे, अशोक घुले,अवसरी बुद्रुक पेठ गट आनंदराव शिंदे, मच्छिंद्र गावडे, शांताराम हिंगे, अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी ज्ञानेश्वर आस्वारे, महिला राखीव प्रतिनिधी पुष्पलता जाधव, प्रिया बाणखेले, इतर मागासवर्गीय प्रतिनिधी नितीन वावळ, भटक्या विमुक्त जाती व जमाती रामहरी पोंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे. दरम्यान, भीमाशंकर कारखान्यावर स्थापनेपासून माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. उमेदवार विजयी झाल्यानंतर क्रीडा संकुल परिसरात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांत सारंग कोडलकर तर सहायक म्हणून तहसीलदार रमा जोशी यांनी काम पाहिले.

Web Title: ncp dilip walse Patil's undisputed dominance over the Bhimashankar sugar factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.