ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात ‘राष्ट्रवादी’चे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:13 AM2021-01-19T04:13:57+5:302021-01-19T04:13:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यातील ७४८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून यात राष्ट्रवादी कॉंग्रेसने वर्चस्व कायम राखले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यातील ७४८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून यात राष्ट्रवादी कॉंग्रेसने वर्चस्व कायम राखले आहे. भाजपा, शिवसेनेने आपले पारंपरिक गड राखले आहेत. तर मावळ, जुन्नर तालुक्यात काही ठिकाणी चुरशीचे निकाल लागले. गेल्या अनेक वर्षांपासून ताब्यात असलेली ओतुर ग्रामपंचायत शिवसेनेला गमवावी लागली.
निकालानंतर आता सर्वांच्या नजरा सरपंचपदाच्या सोडतीकडे लागल्या आहेत. याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. जिल्ह्यात गेल्या एक महिन्यांपासून ग्रामपंचायत निवडणुकीचा रणसंग्राम सुरू होता. जिल्ह्यात डिसेंबर अखेरपर्यंत मुदत संपलेल्या ७४८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यातील ९५ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. तर ६४९ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान झाले होते. त्याचा निकाल सोमवारी (दि. १८) लागला.
दौंड तालुक्यातील पाटस ग्रामपंचायतीत जिल्हा परिषदेच्या विद्यमान समाजकल्याण सभापती सारीका पानसरे यांचे पती राजेंद्र यांचा पराभव झाला. खेड तालुक्यातील आंबोली गावात माजी सभापती सुरेश शिंदे यांच्या पॅनेलचा देखील पराभव झाला. शिरूर तालुक्यात शिक्रापूर ग्रामपंचायत निवडणुकीत माजी बांधकाम सभापती मंगलदास बादल यांच्या पॅनेलला तर पुरंदर तालुक्यातील नीरा ग्रामपंचायतीत माजी जिल्हा परिषद सभापती दत्ता चव्हाण यांना स्वत:ला पराभव पाहावा लागला. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय कोलते यांचे बंधू संभाजी कोलते यांना देखील पराभवाला सामोरे जावे लागले.
जिल्ह्यात बहुतेक आमदारांनी ग्रामपंचायत निवडणुकीत आपले वर्चस्व राखण्यात यश मिळवले. आंबेगाव तालुक्यात मंचर ग्रामपंचायतीसह शिवसेने निम्म्या जागा मिळविल्या. येथे ‘राष्ट्रवादी’ला देखील चांगले यश मिळाले. जुन्नर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असले तरी शिवसेनेनेही जागा राखल्या. खेड तालुक्यात माजी आमदार सुरेश गोरे यांच्यानंतर पक्षात पोकळी निर्माण झाली असली तरी अनेक ग्रामपंचायतीत गोरे यांचे फोटो लावून निवडणुका लढविण्यात आल्या. एकूण जागांचा विचार करता आमदार दिलीप मोहिते यांनी वर्चस्व कायम ठेवले. भाजपचे शरद बुट्टे पाटील व अतुल देशमुख यांनी देखील जोर लावत काही ग्रामपंचायतीत भाजपचा झेंडा फडकविला.
शिरूर तालुक्यात आमदार अशोक पवार यांना स्वत:च्या वडगाव रासाईत पराभव पत्करावा लागला असला तरी तालुक्यातल्या अन्य अनेक ग्रामपंचायती राखण्यात यश मिळाले. येथे भाजप-शिवसेनेला देखील चांगल्या जागा मिळाल्या आहेत. मावळ तालुक्यात ‘राष्ट्रवादी’पेक्षा भाजपला जास्त जागा मिळाल्या. भोर तालुक्यात आमदार संग्राम थोपटे यांनी गड राखला. पुरंदर तालुक्यातील कॉंग्रेस आमदार संजय जगताप यांना धक्का बसला असून शिवसेनेचे वर्चस्व कायम ठेवले आहे. दौंड तालुक्यात राष्ट्रवादी व भाजपा या दोघांनी चांगले यश मिळवले. इंदापूर तालुक्यात राज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांना देखील चांगले यश मिळाले आहे. बारामती तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व राखले.