राष्ट्रवादीला तगड्या आव्हानाचा सामना
By admin | Published: January 9, 2017 03:41 AM2017-01-09T03:41:08+5:302017-01-09T03:41:08+5:30
महापालिका निवडणुकीच्या रणांगणात मागील दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसला मागे टाकत सर्वांत मोठा पक्ष बनलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्याचं कारभारीपण स्वत:कडे घेतले.
पुणे : महापालिका निवडणुकीच्या रणांगणात मागील दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसला मागे टाकत सर्वांत मोठा पक्ष बनलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्याचं कारभारीपण स्वत:कडे घेतले. गेल्या दहा वर्षांत शहरात केलेल्या विकासकामांची जंत्री घेऊन राष्ट्रवादी पुन्हा २०१७ च्या निवडणुकांना सामोरे जात आहे. त्याच वेळी मोदीलाटेवर स्वार होत लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये मोठं यश मिळविणाऱ्या भाजपाने त्यांच्यासमोर मोठं आव्हान उभं केलं आहे. या आव्हानाचा सामना करीत राष्ट्रवादी आपलं पहिलं स्थान कायम राखण्यात यशस्वी होणार का, याचे उत्तर येत्या काही दिवसांत मिळणार आहे.
राज्यातील प्रमुख दहा महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम एक -दोन दिवसांत जाहीर होईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोच्च नेते असलेल्या शरद पवार यांच्या जिल्ह्यातील पुणे व पिंपरी-चिंंचवड महापालिकांचा यामध्ये समावेश आहे. दोन्ही महापालिकांवर सध्या राष्ट्रवादीचीच सत्ता असून, त्याचे कारभारीपण माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आहे. त्यामुळे आगामी निवडणूक राष्ट्रवादीच्या प्रतिष्ठेची लढाई असणार आहे.
हडपसर, वडगावशेरी, धनकवडी, वारजे, शिवाजीनगर गावठाण, सहकारनगर ही राष्ट्रवादीची बलस्थाने राहिली आहेत. पालिकेतील दहा जागांमध्ये यंदा वाढ झाली आहे, त्या जागा प्रामुख्याने हडपसर, वडगावशेरी व खडकवासला मतदारसंघात वाढल्या आहेत. हा भाग राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात आहे. या बालेकिल्ल्यात कमळ फुलविण्यासाठी भाजपाकडून इतर पक्षांतील आजी-माजी नगरसेवक आयात केले जात आहेत. इथे राष्ट्रवादीला रोखण्यासाठी भाजपाकडून संपूर्ण ताकद पणाला लावण्यात आली आहे. पर्वती मतदारसंघामध्ये मनसेच्या गदादे कुटुंबीयांनी राष्ट्रवादीत केलेल्या प्रवेशामुळे पक्षाला मजबुती आली आहे.
कसबा, कोथरूड, पर्वती या मतदारसंघातील अनेक प्रभागांमध्ये भाजपाचे वर्चस्व आहे. इथे राष्ट्रवादीची ताकद त्यामाने कमी आहे. शिवाजीनगर आणि कॅन्टोंमेंट मतदारसंघातील प्रभागांमध्येही राष्ट्रवादीला विजयासाठी मोठा जोर लावावा लागणार आहे.
राष्ट्रवादीच्या वतीने गेल्या ५ वर्षांत शहरात नियोजनबद्ध विकासकामे करण्यात आली आहेत. साधारणत: दहा वर्षांनी सत्तेतील पक्षाविरुद्ध अॅन्टी इन्कबन्सीचे चित्र दिसून येते. मात्र राष्ट्रवादीबाबत असे कुठेही वातावरण नाही. शहरात झालेल्या विकासकामांच्या जोरावर महापालिकेला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक सन्मान मिळालेले आहेत. त्यामुळे शहराच्या वेगवान विकासासाठी राष्ट्रवादीशिवाय पर्याय नसल्याचे मतदारांना वाटते आहे. याउलट भाजपाला अनेक
प्रभागांमध्ये उमेदवार मिळत नसल्याने इतर पक्षांमधून लोक आयात करावे लागत आहेत.
- खासदार वंदना चव्हाण, शहराध्यक्षा, राष्ट्रवादी काँग्रेस
आमदार, खासदारांनी काय केले?$$्निराष्ट्रवादी मोठ्या आत्मविश्वासाने निवडणुकीला सामोरे जात आहे. राष्ट्रवादीच्या एकाही पदाधिकाऱ्याविरुद्ध भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही. भाजपाचे एक खासदार व ८ आमदार या शहराने निवडून दिले; मात्र गेल्या अडीच वर्षांत त्यांना शहरासाठी एकही मोठा प्रकल्प अथवा निधी आणता आलेला नाही. पुणे मेट्रो, जायका हे आघाडी सरकारच्या काळात झालेले प्रकल्प आहेत. याउलट राष्ट्रवादीने शहर विकासासाठी भरीव योगदान गेल्या काही वर्षांत दिले आहे.- प्रशांत जगताप, महापौर