राष्ट्रवादी काँग्रेस ही महाराष्ट्राला व देशाला लागलेली कीड; चंद्रशेखर बावनकुळेंचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 16:50 IST2023-03-27T16:50:08+5:302023-03-27T16:50:30+5:30
आमची संघटना वाढवून बारामती लोकसभा व संपूर्ण विधानसभा जिंकण्याचा प्रयत्न करणार

राष्ट्रवादी काँग्रेस ही महाराष्ट्राला व देशाला लागलेली कीड; चंद्रशेखर बावनकुळेंचा घणाघात
इंदापूर : राष्ट्रवादी काँग्रेस ही महाराष्ट्राला व देशाला लागलेली कीड आहे. हे सांगण्यासाठी १५२ व्या शाखेच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत आम्ही येऊ. त्यावेळी खोटे काही ही न सांगता सारे पडद्यावर दाखवू असे संकेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी (दि.२६) नगरपरिषदेच्या पटांगणाच्या जाहीर सभेत बोलताना दिले.
बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपच्या युवा मोर्चा व युवा वॉरियर्सच्या ५२ शाखांच्या उद्घाटन समारंभानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जाहिर सभेत ते बोलत होते. आमदार गोपीचंद पडळकर,भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, माजी आमदार हर्षवर्धन पाटील,युवा मोर्चाचे प्रदेश सचिव दीपक काटे यावेळी उपस्थित होते.
बावनकुळे म्हणाले की,तीन महिन्यांच्या कालावधीत बारामती लोकसभा मतदार संघात १५२ शाखा स्थापन करण्यात येतील. आपली संघटना वाढवून बारामती लोकसभा व संपूर्ण विधानसभा जिंकण्याचा प्रयत्न आपण करु. केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून उरलेली कामे पूर्ण करु.
त्यांनी चार वेळा मुख्यमंत्री पद असून काहीच केले नाही - गोपीचंद पडळकर
राज्याचे नेतृत्व, केंद्र व राज्यातील सत्ता, चार वेळा मुख्यमंत्री पद असून देखील आधीच्या सत्ताधा-यांना दुष्काळी भागातील पाण्याचा प्रश्न सोडवता आला नाही. १९९५ ते ९९ या काळात राज्यात भाजप सेनेची सत्ता आल्यानंतर पाण्याचे नियोजन झाले. त्यानंतर १९९९ ते २०१४ पर्यंत उपसासिंचन योजनांची स्थिती जैसे थे अशीच राहिली.देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी उपसासिंचन योजनांना चालना दिली. मुख्यमंत्रीपदाच्या पाच वर्षाच्या कालावधीत, त्यांनी विदर्भ, मराठवाडा, प. महाराष्ट्र, मुंबई, खानदेश या सर्व भागांचा सारासार विचार करुन शेतक-यांसाठी नेमके काय लागेल याची योग्य उपाययोजना केली.