"...त्यांनी नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या नावाने चिन्हाची मागणी करावी"
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 10:12 AM2022-10-12T10:12:44+5:302022-10-12T10:15:24+5:30
सर्व मंडळी ईडीच्या धाकाने शिंदे गटात जाऊन बसली.....
बारामती (पुणे) : बाळासाहेब ठाकरेंऐवजी नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या नावाने चिन्हाची मागणी करा. तुम्हाला ताकद दिसून येईल, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदे गटाला आव्हान दिले आहे.
आमदार मिटकरी हे बारामतीत आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी शिंदे गटाला खुले आव्हान देत टोला लगावला. मिटकरी म्हणाले, शिवसेनेचे अधिकृत धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवले आहे. शिवसेनेला ‘मशाल’ हे निवडणूक चिन्ह तर ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव मिळाले आहे. असे असताना शिंदे गटही बाळासाहेब ठाकरेंच्या नावाची मागणी करून चिन्हाची मागणी करीत आहे. मात्र, त्यांनी नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या नावाने चिन्हाची मागणी करावी, तुम्हाला ताकद दिसून येईल, असा टोलादेखील आमदार मिटकरी यांनी शिंदे गटाला लगावला.
जनसंघ, काँग्रेस या पक्षांनाही वेगवेगळी चिन्हे बदलावी लागली. त्यामुळे फारसा फरक पडला नाही. बाळासाहेब ठाकरे हे नाव ज्या ठिकाणी आहे. तेथे शिवसैनिकांचे रक्त सळसळल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे मशाल चिन्हालाच लोक पसंती देतील, असा दावा मिटकरी यांनी केला. मशाल हे जसे क्रांतीचे प्रतीक आहे तसेच शिवसेनाही क्रांतीचे प्रतीक आहे. मित्रपक्ष म्हणून आमचा शिवसेनेला पाठिंबा असल्याचे मिटकरी यांनी सांगितले.
सर्व मंडळी ईडीच्या धाकाने शिंदे गटात जाऊन बसली
राष्ट्रवादीने शिवसेना संपवली, असा आरोप शिंदे गटाचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी केला होता. यावर बोलताना मिटकरी म्हणाले, भावना गवळी, अडसूळ, प्रतापराव जाधव ही सर्व मंडळी ईडीच्या धाकाने शिंदे गटात जाऊन बसली. शिवतारे यांचे आता वय वाढले आहे. त्यांच्या डोक्यावर परिणाम झाल्याची टीकाही मिटकरी यांनी केली.