शरद पवारांवरील टीका 'मानसपुत्रा'च्या जिव्हारी; निषेध व्यक्त करत वळसे पाटलांनी खोतांना दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 01:53 PM2024-11-07T13:53:44+5:302024-11-07T13:56:00+5:30

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही खोत यांच्यावर निशाणा साधला आहे.

NCP leader and state cabinet minister Dilip Valse Patil has also targeted sadabhau Khot | शरद पवारांवरील टीका 'मानसपुत्रा'च्या जिव्हारी; निषेध व्यक्त करत वळसे पाटलांनी खोतांना दिला इशारा

शरद पवारांवरील टीका 'मानसपुत्रा'च्या जिव्हारी; निषेध व्यक्त करत वळसे पाटलांनी खोतांना दिला इशारा

Dilip Walse Patil ( Marathi News ) : रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आणि विधानपरिषद आमदार सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतूनही संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. स्वत: अजित पवार यांनी सदाभाऊ खोत यांना फटकारल्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही खोत यांच्यावर निशाणा साधला आहे.

दिलीप वळसे पाटील म्हणाले की, "ज्येष्ठ नेते आमचे सर्वांचे आधारस्तंभ आदरणीय शरद पवार साहेबांविषयी सदाभाऊ खोत यांनी अतिशय खालच्या थराला जाऊन घृणास्पद वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करावा तेवढा कमी असून, अतिशय संतापजनक वक्तव्य आहे. या संपूर्ण प्रकारचा मी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करतो आणि अशा प्रकारची वक्तव्ये आम्ही कदापीही खपवून घेणार नाही. तसेच या प्रकारची वक्तव्ये सर्वांनी टाळावीत व एक तारतम्य आणि भान बाळगून प्रचार करावा," अशी भूमिका वळसे पाटील यांनी मांडली आहे.

सदाभाऊ खोत यांच्याकडून दिलगिरी

शरद पवारांवरील वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त करत सदाभाऊ खोत म्हणाले की, "कोणाच्या व्यंगत्वाकडे बघून बोलण्याचा माझा हेतू नव्हता. ही गावगाड्याची भाषा आहे, परंतु काही लोकांनी त्या शब्दाच्या अर्थाचा विपर्यास केला. यामुळे जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माझे शब्द मागे घेतो, दिलगिरी व्यक्त करतो." 

दरम्यान, "गावाकडे एखादा आभाळाकडे बघून बोलायला लागला तर आम्ही त्याला म्हणतो की, जा आरशात जाऊन बघ जरा. पण गावगाड्यातील भाषा समजून घेण्यासाठी मातीमध्ये रुजावं लागतं, झिजावं लागतं, राबावं लागतं. त्यावेळी गावाकडील आणि मातीची भाषा समजते," असा टोलाही यावेळी सदाभाऊ खोत यांनी लगावला होता.

Web Title: NCP leader and state cabinet minister Dilip Valse Patil has also targeted sadabhau Khot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.