शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 04:17 PM2024-04-27T16:17:13+5:302024-04-27T16:21:13+5:30
Shirur Lok Sabha: प्रकृतीत सुधारणा झाली असून पूर्ण ताकदीने शिवाजीराव आढळराव पाटील यांचा प्रचार करणार असल्याचं वळसे पाटलांनी जाहीर केलं आहे.
Dilip Walse Patil ( Marathi News ) :शिरूर लोकसभा मतदारसंघात यंदा राष्ट्रवादीचेच दोन उमेदवार आमने-सामने आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीकडून माजी खासदार शिवाजीराव आढळराव निवडणूक रिंगणात आहेत, तर त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे निवडणूक लढवत आहेत. आढळराव पाटील यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने शिरूर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या विविध विधानसभा मतदारसंघांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रवादीच्या आमदारांची ताकद आढळरावांच्या पाठीशी उभी राहणार आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री दिलीप वळसे पाटील यांचंही शिरूर लोकसभा मतदारसंघात मोठं राजकीय वलय आहे. मात्र वळसे पाटलांना दुखापत झाल्याने ते मागील काही आठवड्यांपासून प्रचारातून दूर होते. परंतु आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून पूर्ण ताकदीने शिवाजीराव आढळराव पाटील यांचा प्रचार करणार असल्याचं वळसे पाटलांनी जाहीर केलं आहे.
शिरूर लोकसभेबाबत बोलताना दिलीप वळसे पाटील म्हणाले की, "माझी प्रकृती आता एकदम ओके आहे. गेल्या १५ दिवसांत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे. प्रकृतीत सुधारणा झाल्याबरोबर मी माझ्या मतदारसंघात जाऊन जनतेची चौकशी करणार आहे आणि शक्य होईल तेवढी शिवाजीराव आढळराव पाटील यांना निवडून आणण्यासाठी मदत करणार आहे. ते नक्कीच विजयी होतील," असा विश्वासही वळसे पाटलांनी व्यक्त केला आहे.
आंबेगाव तालुक्याच्या राजकारणावर एकहाती वर्चस्व असणारे आणि आजूबाजूच्या तालुक्यांमध्येही चांगला जनसंपर्क असणारे दिलीप वळसे पाटील हे पुन्हा महायुतीच्या प्रचारात सक्रिय होणार असल्याने शिवाजीराव आढळराव पाटील यांची बाजू आणखी भक्कम होण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, मागील महिन्यात घरात झालेल्या दुर्घटनेत दिलीप वळसे पाटील यांच्या खुब्याला मार लागला होता. तसंच त्यांचा हातही फ्रॅक्चर झाला होता. त्यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. जवळपास महिनाभर उपचार घेतल्यानंतर आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे.
शिरूर लोकसभेत कशी आहे राजकीय स्थिती?
लोकसभा निवडणुकांच्या तोंडवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवाजीराव आढळराव पाटलांनी राष्ट्रवादीचं घड्याळ हाती घेतलं. २००४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत गेलेल्या शिवाजीराव आढळराव पाटलांची तब्बल दोन दशकांनंतर घरवापसी झाली आहे. अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी महायुतीत सहभागी झाल्यामुळे अनेक मतदारसंघांमधील राजकीय गणिते बदलली आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार यांच्या नेतृत्वात काम करण्याचा निर्णय घेतला. मात्र तरीही महायुतीच्या जागावाटपात शिरूरची जागा आपल्याकडेच राहायला हवी, अशी आग्रही भूमिका अजित पवार यांनी घेतली. त्यामुळे या मतदारसंघात महायुतीचा उमेदवार नक्की कोण असणार, याबाबत मोठी चर्चा झाली. महायुतीत झालेल्या खलबतांनंतर शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव हे राष्ट्रवादीच्या चिन्हावर या मतदारसंघातून निवडणूक लढवतील, हे निश्चित झालं. त्यामुळे आढळराव पाटलांनी मागील महिन्यात राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि त्यानंतर त्यांची उमेदवारीही घोषित झाली.