"नव्या पुण्याच्या 'शिल्पकारांनी' केलेला विकास पुण्याच्या रस्त्यावरून वाहतोय"
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2022 12:55 IST2022-10-18T12:55:09+5:302022-10-18T12:55:31+5:30
जयंत पाटीलांचा फडणवीसांना अप्रत्यक्ष टोला

"नव्या पुण्याच्या 'शिल्पकारांनी' केलेला विकास पुण्याच्या रस्त्यावरून वाहतोय"
शहराला सोमवारी रात्री अचानक पावसाने चांगलेच झोडपून काढले. यामुळे खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांसह, पेठांमधील दुकानदार, हाॅकर्स यांच्यासह स्थानिकांचे हाल झाले. यात अनेकांच्या गाड्या बंद पडल्या. त्यामुळे लहान लेकरांना साेबत घेऊन आलेल्या कुटुंबांची चांगलीच तारांबळ उडाली हाेती. त्यातच विजांचा कडकडाट झाल्याने मुले घाबरत हाेती. अनेक जण जीव मुठीत घेऊन आडाेसा शाेधत हाेते. या पावसाने रस्त्यांवर पुन्हा पाणीचपाणी झाले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अप्रत्यक्षरित्या टोला लगावला. ‘नव्या पुण्याच्या शिल्पकारांनी‘ पाच वर्ष पुण्याचा केलेला विकास पुण्याच्या रस्त्यावरून वाहत आहे, अशा शब्दात यांनी निशाणा साधला.
पुण्यासारख्या जागतिक पातळीवर महत्वाच्या असणाऱ्या शहरात असे चित्र निर्माण होणे हे अत्यंत दुर्दैवी आहे असेही जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. पुणे शहरात अक्षरशः रस्त्यांच्या नद्या बनलेल्या आहेत. गेली २४ तास नागरिकांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. गेली पाच वर्ष पुणे महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे असेही त्यांनी नमूद केले.
पुणे शहरात अक्षरशः रस्त्यांच्या नद्या बनलेल्या आहेत. गेली २४ तास नागरिकांना प्रचंड मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) October 18, 2022
गेली पाच वर्ष पुणे महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता होती. ‘नव्या पुण्याच्या शिल्पकारांनी‘ पाच वर्ष पुण्याचा केलेला विकास पुण्याच्या रस्त्यावरून वाहत आहे. pic.twitter.com/fGJX1hPVwF
दरम्यान, शहरात काल सकाळपासूच ढगाळ वातावरण होतो. काहीकाळ वातावरण मोकळे होऊन ऊन पडले मात्र, सायंकाळी पुन्हा ढगांची गर्दी वाढली. रात्री ९ च्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. जोरदार सरींसोबत ढगांचा गडगडाटही सुरूच होता. शिवाजीनगर, कोथरूड, कात्रज, हडपसर, सिंहगड रस्ता भागाला पावसाने चांगलेच झोडपून काढले. असाच पाऊस पिंपरी चिंचवड परिसरातही सुरू होता.
याबाबत हवामान अंदाज विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम काश्यपी म्हणाले की, अरबी समुद्रावरून राज्यावर येणारे आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांत पुन्हा पावसाचे असेच प्रमाण असण्याची शक्यता आहे. त्यानंतर आर्द्रतेचे प्रमाण कमी होऊन पाऊस कमी होईल.