विधानसभेच्या मध्यवर्ती निवडणुका लागण्याची शक्यता; रोहित पवारांचं भाकित
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 10:28 AM2022-07-25T10:28:45+5:302022-07-25T10:34:27+5:30
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर विधानसभेच्या मध्यवर्ती निवडणुका लागण्याची शक्यता...
नारायणगाव : येत्या तीन महिन्यांत मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर विधानसभेच्या मध्यवर्ती निवडणुका लागण्याची शक्यता असल्याने कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. २०२४ ला आपल्या विचारांचे सरकार आणायचे आहे. राष्ट्रवादी आमदार अतुल बेनके हे विकास व विचारांचे राजकारण करतात. त्यामुळे २०२४ ला अतुल बेनके हेच पुन्हा ५५ हजार ५५५ मतांनी विधानसभेत जाऊन विकासाची गंगा आणतील, असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला.
आमदार अतुल बेनके म्हणाले की, माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांनी जो पाया रचला आहे, त्याचेच आचारविचार मी पुढे नेत आहे. या पुढील काळात उमेदवार कोणी असो, मात्र तो ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विचाराचा असावा. या पुढील काळात कितीही प्रलोभने आली तरी आम्ही आमचे विचार बदलणार नाहीत. आम्ही सर्वजण एकजूट व एक विचाराचे आहोत. या पुढील काळातही मी जुन्नर तालुक्यातील जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध आहे.
जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांच्या वाढदिवसानिमित्त कांदळी येथील औद्योगिक वसाहतीत आयोजित कार्यक्रमात आमदार पवार हे बोलत होते. आमदार अतुल बेनके, आमदार नीलेश लंके, राजश्री बेनके, विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संजय काळे, माजी जि. प. सदस्य शरद लेंडे, विवेक वळसे पाटील, पांडुरंग पवार, अंकुश आमले, मोहित ढमाले, तान्हाजी बेनके, अनिल मेहेर, अमित बेनके, डॉ. अमोल बेनके, सरपंच विक्रम भोर, विकास दरेकर, उज्ज्वला शेवाळे, अतुल कुलकर्णी, सूरज वाजगे, विशाल भुजबळ, गौरव बोरा, गणेश वाजगे, अतुल आहेर उपस्थित होते.
आ. बेनके यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तालुक्यात विविध ठिकाणी सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रीतम काळे यांच्याकडून ४२ शालेय विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले.