'तो फोटो मी काढलाच नाहीय, मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री...'; रुपाली पाटील यांचं स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2023 03:40 PM2023-02-26T15:40:26+5:302023-02-26T15:41:09+5:30
सदर प्रकरणावरुन टीका झाल्यानंतर रुपाली पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
कसबा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या मतदानाच्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी स्वतःचा मतदानाचा हक्क बजावताना ईव्हीएम मशीनचा फोटो काढून गोपनीयतेचा भंग केला असल्याची चर्चा रंगली आहे. मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास मनाई असताना रुपाली ठोंबरे पाटील यांनी आत मोबाईल नेला कसा, निवडणूक आयोग काय कारवाई करणार आदी प्रश्न त्यांच्या पोस्टवर विचारले जात आहेत.
सदर प्रकरणावरुन टीका झाल्यानंतर रुपाली पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. हो मी सदर फोटो पोस्ट केला आहे. मात्र मला एका कसब्यातील मतदाराने हा फोटो पाठवला. त्यानंतर मी हा फोटो फेसबुकवर शेअर केला. मी तो फोटो काढलाच नाही. मी अजूनही मतदान केलेलं नाही. स्वत: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी येऊन तपासावे की मी मतदान केलंय की नाही. मात्र माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करायचा असेल तर करू शकता. तसेच मी ४.३० वाजता आदर्श विद्यालय येथे मतदान करणार असल्याचे रुपाली पाटलांनी सांगितले.
चिंचवड विधानसभा मतदारसंघात देखील अनेक मतदारांचा आततायीपणा दिसून येतोय. आपण कोणत्या उमेदवाराच्या बाजूने आहे हे दाखवण्याच्या हव्यासातून मतदान करतानाचे मोबाईलमध्ये चित्रीकरण केल्याची माहिती समोर आली. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या उपाययोजनांवर ही प्रश्न उपस्थित झालेत.
पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघात भाजपचे महापालिकेतील गटनेते गणेश बिडकर हे मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप कॉंग्रेसने केलाय. सोमवार पेठेतील एका इमारतीत गणेश बिडकर हे भाजपच्या इतर कार्यकर्त्यांसह पैशांच वाटप करत असताना कॉंग्रेसचे कार्यकर्ते तिथे पोहचले आणि त्यानंतर दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमधे झटापट देखील झाली असं कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी सांगितलं.