दोन्ही भावांनी एकत्र येण्याची हीच वेळ, महाराष्ट्राला दाखवून द्या की...; रुपाली पाटलांची मनसे इच्छा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 06:14 PM2022-06-27T18:14:13+5:302022-06-27T18:14:59+5:30
राज्यात सुरु असलेल्या या चर्चांवर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
पुणे: शिवसेनेचे बडे नेते एकनाथ शिंदे यांच्यासह पक्षाच्या ३५ हून अधिक आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकारणात अगदी वेगवान घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. यातच आता एकनाथ शिंदे गटाकडे विलिनीकरणाची वेळ आली, तर मनसेचा पर्यायाकडे सकारात्मकतेने पाहिले जाऊ शकते, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे.
राज्यात सुरु असलेल्या या चर्चांवर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे गट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत हातमिळवणी करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे. मात्र राज ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं, असं मत रुपाली पाटील- ठोंबरे यांनी व्यक्त केलं आहे.
''दोन्ही भावांनी एकत्र येण्याची हीच वेळ आहे...आणि महाराष्ट्राला दाखवून द्यायचं की होय आम्ही बाळासाहेबांची पोरं आहोत..आमच्याकडे कोणी वाकड्या नजरेनं पाहू शकत नाही...हा इशारा भाजपाला देणं गरजेचं आहे'', असं रुपाली पाटील-ठोंबरे 'लोकमत'शी बोलताना म्हणाल्या.
दरम्यान, एकनाथ शिंदे गट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत विलीन होणार का, या मुद्द्यावर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी थेट बोलणे टाळले. परंतु त्याने या मुद्द्याचे खंडन केले नाही. सध्या यावर आता भाष्य करणे घाईचे ठरेल, असे ते म्हणाले. त्यामुळे शिंदे गट मनसेत विलीन होणार की नाही ही चर्चा कायम आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत मनसेची वेट अँड वॉचची भूमिका आहे, अशी माहिती नांदगावकर यांनी दिली.
राजकीय सत्ता संघर्षात मनसेच्या नेत्यांची बैठक-
राजकीय सत्ता संघर्षात मनसेच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला पक्षप्रमुख राज ठाकरे, बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई उपस्थित होते. सध्याच्या राजकीय परिस्थितीत मनसेची वेट ॲंड वॉचची भूमिका आहे. या सर्व राजकीय घडामोडीत एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना फोन केल्याची बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांनी आतापर्यंत दोनदा राज ठाकरेंना फोन केला आहे. यावेळी राज यांच्या प्रकृतीसोबतच राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत चर्चा केली. त्यामुळे सत्तानाट्यात मनसेची एन्ट्री झाली आहे. एकनाथ शिंदे गटाला विलीनीकरण करायचे असल्यास त्यांच्यासमोर भाजप, प्रहार यांचा पर्याय होता. परंतु त्यात मनसे हादेखील चांगला पर्याय शिंदे गटाला ठरू शकतो याबाबत चाचपणी केली जात असल्याची चर्चा सुरू आहे.