पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यानं विद्यार्थ्यांना धमकी देत उकळली 10 लाखांची खंडणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 01:12 PM2022-02-28T13:12:33+5:302022-02-28T13:14:13+5:30
'पुण्यात शिकायचं असेल तर पैसे दे', राष्ट्रवादीच्या विद्यार्थी नेत्यानं उकळली 10 लाखांची खंडणी...
पुणे : पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी नेत्यानं एका विद्यार्थ्याकडून दहा लाखांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाला धमकावून त्याच्याकडून दहा लाख रुपयांची खंडणी उकळली व आणखी दोन लाख रुपयांची मागणी करणाऱ्या सराईत गुंडाला चतुःश्रृंगी पोलिसांनी अटक केली आहे.
अमर सूर्यकांत पोळ (रा.मु.पो, खंडाळी, ता. अहमदपूर, जि. लातूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याचा साथीदार करण मधुकर कोकणे (रा. अमरकुंज सोसायटी, हडपसर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एका २३ वर्षांच्या तरुणाने चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी करण कोकणे हा पुणे जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा अध्यक्ष आहे
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पुण्यात शिक्षण घेत आहेत. त्यांची एका मित्राद्वारे अमर पोळ याच्याशी ओळख झाली होती. त्याने डिसेंबर २०१९ मध्ये नवीन सोशल मीडियाचे व्यवसायासाठी ऑफिस सुरू करण्यासाठी फिर्यादीकडे ५० लाख रुपयांची मागणी केली. तेव्हा फिर्यादी यांनी पैसे देण्यास टाळाटाळ केली.
तेव्हा पोळ याने तू आम्हाला पैसे का देत नाही, तुला आम्ही पैसे मागतो ते समजत नाही का, तुला तुझा जीव महत्त्वाचा नाही का, तुला आम्हाला पैसे द्यायचे नाही का, तुला पुण्यात शिक्षण करू देणार नाही. तुला संपवून टाकू, अशी धमकी दिली. फिर्यादीकडून पाच लाख रुपये बैंक ट्रान्सफरद्वारे घेतले. तसेच करण कोकणे याने आणखी एका तरूणाकडून २ ते ३ लाख रुपये रोख स्वरूपात घेतले.
काही दिवसात पैसे परत करण्याचे आश्वासन देऊन पैसे न दिल्याने त्यांनी पैसे परत मागितल्यावर त्यांच्याकडे आणखी दोन लाख रुपयांची मागणी केली. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अमर पोळ याला अटक केली असून, पोलीस उपनिरीक्षक मोहन जाधव तपास करीत आहेत.