पवारसाहेब देतील तो आदेश अंतिम: पक्षप्रवेश टाळला, पण निलेश लंकेंनी दिले स्पष्ट संकेत!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 05:55 PM2024-03-14T17:55:53+5:302024-03-14T17:57:27+5:30
आपण शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचं आमदार लंके यांनी सांगितलं आहे.
Pune Nilesh Lanke ( Marathi News ) : राष्ट्रवादीचे पारनेर विधानसभा मतदारसंघातील आमदार निलेश लंके यांनी काही वेळापूर्वी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या पुण्यातील कार्यालयात भेट घेतली. निलेश लंके यांनी कोरोना काळातील आपल्या अनुभवांवर आधारित एक पुस्तक लिहिलं असून या पुस्तकाचे प्रकाशन शरद पवारांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करतील, असं बोललं जात होतं. मात्र आपण शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचं आमदार लंके यांनी सांगितलं असलं तरी आज त्यांनी पक्षप्रवेश करणं टाळलं आहे.
आपली राजकीय भूमिका स्पष्ट करताना निलेश लंके म्हणाले की, "मी पवार साहेबांच्याच विचारांचा आहे. मी शरद पवारांचे नेतृत्व कधीच सोडलेले नाही. खासदारकीच्या निवडणुकीबाबत शरद पवारांसोबत कोणतीही चर्चा झालेली नाही. मी पुस्तक प्रकाशनासाठी इथे आलेलो आहे. मी लोकसभा निवडणुकीबाबत निर्णय घेण्यासाठी लहान कार्यकर्ता आहे," असं निलेश लंके यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, तुम्ही भविष्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरही दिसणार का, असा प्रश्नही निलेश लंके यांना यावेळी विचारण्यात आला. त्यावर "साहेबांच्या विचारधारेला सोडून जाणं एवढ सोपे नाही," असं म्हणत लंके यांनी भविष्यात शरद पवार यांच्याच नेतृत्वात काम करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे तांत्रिक अडचणींमुळे सध्या निलेश लंके यांनी पक्षांतर करणं टाळलं आहे का, याबाबतची चर्चा सुरू झाली आहे.