राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना चंद्रकांतदादांना दिला 'हा' मोलाचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 07:49 PM2021-06-10T19:49:45+5:302021-06-10T19:51:35+5:30
दिल्लीत पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकीवर प्रतिक्रिया...
पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष व कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. यात भाजपसोबत सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांचा देखील समावेश आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी चंद्रकांत दादांच्या सर्व मनोकामना पुर्णम होवोत अशा शुभेच्छा दिल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाच एक सल्ला दिला आहे.
भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना रोहित पवार यांनी चंद्रकांतदादा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! निरोगी दीर्घायुष्य प्राप्त होवी ही प्रार्थना अशा शब्दात शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. मात्र, याचवेळी त्यांनी पाटील यांनी लोकांची सेवा केली पाहिजे असा सल्ला दिला आहे. तसेच विरोधी पक्ष आणि चंद्रकांतदादांनी केंद्र व राज्याची नेमकी अडचण काय आहे, याचा विचार करायला हवा.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त भाष्य करताना ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकर्ते हीच ताकद आहे. पुढील काळात नवीन आव्हाने पेलण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. त्यात तरुणांकडे आमचं विशेष लक्ष असणार आहे.
मोदी आणि ठाकरे यांच्या भेटीवर रोहित पवार म्हणाले...
दिल्लीत पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खासगी बैठकीवर प्रतिक्रिया देताना पवार म्हणाले, या भेटीची जे चर्चा करता आहेत त्यांचा त्यांचा अभ्यास कमी असल्याचे दिसते.आणि ही मुद्दाम घडवून आणलेली चर्चा आहे. तसेच भाजपवर टीका करताना ते म्हणाले, राजकारणात एक असा पक्ष आहे ज्यात सातत्याने आपण राज्य आणि देशात सत्तेत राहावं, असा अहंकार नेहमी बघायला मिळतो.