राष्ट्रवादी-मनसे युतीने कॉँग्रेसला धक्का
By admin | Published: April 16, 2015 12:56 AM2015-04-16T00:56:22+5:302015-04-16T00:56:22+5:30
स्थायी समिती त्यानंतर विषय समित्या आणि आता प्रभाग समितीवरही राष्ट्रवादी आणि मनसेच्या नाशिक पॅटर्नची पुनरावृत्ती बुधवारी दिसून आली.
पुणे : स्थायी समिती त्यानंतर विषय समित्या आणि आता प्रभाग समितीवरही राष्ट्रवादी आणि मनसेच्या नाशिक पॅटर्नची पुनरावृत्ती बुधवारी दिसून आली. महापालिकेच्या पंधरा प्रभाग समितीच्या निवडणुकीत मनसेच्या पाठिंब्याच्या जोरावर सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादीने ७ समित्यांचे अध्यक्षपद मिळविले. राष्ट्रवादीच्या मदतीने मनसेने पाच समित्यांचे अध्यक्षपद पदरात पाडून घेतले. महापालिका निवडणुकीनंतर सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीने आघाडीला हरताळ फासत काँग्रेसकडे दुर्लक्ष केल्याने पालिकेत २८ नगरसेवक असतानाही काँग्रेसला फक्त एकाच प्रभाग समितीवर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे या पदासाठीही समान मतदान झाल्याने काढण्यात आलेल्या चिठ्ठीत भवानी पेठ प्रभाग समितीची लॉटरी कॉंग्रेसला लागली.
पंधरा क्षेत्रीय कार्यालयांतील प्रभाग समितीच्या अध्यक्षपदांची निवडणूक आज पार पडली. या पंधरामधील सात समित्या बिनविरोध झाल्याने उर्वरित आठ समित्यांसाठी मतदान घेण्यात आले. त्यातील सहकारनगर आणि भवानी पेठ समितीमध्ये समान मतदान झाल्याने चिठ्ठीद्वारे अध्यक्ष निवडण्यात आला. स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीपासूनच पालिकेत सत्ताधारी असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. स्थायी समितीच्या निवडणुकीत काँग्रेसला बाजूला करून राष्ट्रवादीने मनसेची साथ घेतल्याने महापालिकेतील राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्याचा प्रत्यय या निवडणुकीत पुन्हा दिसून आला. (प्रतिनिधी)
प्रभागअध्यक्षपक्ष
औंध रोहिणी चिमटे राष्ट्रवादी काँग्रेस
नगर रोड संजिला पठारे राष्ट्रवादी काँग्रेस
येरवडा अनिल टिंगरे राष्ट्रवादी काँग्रेस
हडपसरविजया कापरे राष्ट्रवादी काँग्रेस
कोंढवा-वानवडी नंदा लोणकर राष्ट्रवादी काँग्रेस
सहकारनगरउषा जगताप राष्ट्रवादी काँग्रेस
धनकवडीभारती कदम राष्ट्रवादी काँग्रेस
कोथरूड जयश्री मारणे मनसे
वारजे-कर्वेनगर भाग्यश्री दांगट मनसे
कै. बा.स.ढोले पाटीलसंगीता तिकोने मनसे
टिळक रोडप्रिया गदादे मनसे
घोले रोडआशा साने मनसे
बिबवेवाडीकविता वैरागे भाजपा
विश्रामबागवाडादिलीप काळोखे भाजपा
भवानी पेठअविनाश बागवेकाँग्रेस
1नुकत्याच झालेल्या पालिकेच्या विषय समित्यांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने मनसेच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर करत मदत केली होती. त्यामुळे महापालिकेच्या प्रभाग समित्यांच्या निवडणुकीतही राष्ट्रवादी आणि मनसे यांचे समीकरण कायम राहणार, की सत्ताधारी असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीची मैत्री तशीच राहणार, याकडे लक्ष लागले होते.
2प्रभाग समितीच्या निवडणुकीमध्ये १५ पैकी ७ समित्यांची निवडणूक बिनविरोध झाली. यामध्ये राष्ट्रवादीला चार, भाजपाला दोन, तर मनसेला एक बिनविरोध जागा मिळाली. उर्वरित आठ जागांसाठी निवडणूक झाली. यामध्ये तीन जागांवर राष्ट्रवादीने मनसेच्या मदतीने यश मिळविले. तर मनसेने चार प्रभागात अध्यक्षपदी आपल्या उमेदवाराची वर्णी लावून घेतली.
3राष्ट्रवादीने मनसेबरोबर केलेल्या नवीन घरोब्यामुळे गेल्या वर्षी प्रभाग समितीच्या निवडणुकीत काँग्रेसला पाच जागा मिळाल्या होत्या. मात्र, या वेळी काँग्रेसला एकाच जागेवर समाधान मानावे लागले आहे.
काँंग्रेसला चिठ्ठीची लॉटरी
भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसला चिठ्ठीची लॉटरी लागल्याने या प्रभागाचे अध्यक्षपद नगरसेवक अविनाश बागवे यांच्या पदरात पडले. या समितीसाठी काँग्रेसकडून अविनाश बागवे, शिवसेनेकडून सोनम झेंडे, तर राष्ट्रवादीकडून हिना मोमीन यांनी अर्ज भरला होता. मतदानामध्ये बागवे आणि मोमीन यांना प्रत्येकी ४, तर झेंडे यांना ३ मते मिळाली. सारखी मते मिळाल्यानंतर चिठ्ठी काढण्यात आली. सर्वानुमते भाजपाचे गटनेते गणेश बीडकर यांनी ही चिठ्ठी काढली, यामध्ये बागवे यांचे नाव असल्याने त्यांची अध्यक्षपदी निवड झाल्याचे पीठासन अधिकाऱ्यांनी घोषित केले. विशेष म्हणजे या प्रभाग समितीत असलेले युतीचे नगरसेवक विष्णू हरिहर काही कारणास्तव निवडणुकीस उपस्थित राहू शकले नाहीत. अन्यथा झेंडे यांनाही चार मते मिळाली असती आणि तीन उमेदवारांच्या चिठ्ठ्या काढाव्या लागल्या असत्या त्यामुळे कदाचित ही समितीही काँग्रेसला गमवावी लागली असल्याची चर्चा महापालिकेत होती.
युतीला चिठ्ठीतही दगा
सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महापालिकेत सर्वाधिक नगरसेवक असलेल्या तसेच मनसेची साथ मिळालेल्या राष्ट्रवादीला चिठ्ठी चा आधार घ्यावा लागला. या प्रभागातून माजी सभागृह नेते सुभाष जगताप यांच्या पत्नी उषा जगताप यांनी राष्ट्रवादीकडून, तर सेना, भाजपा युतीकडून स्मिता वस्ते यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. या निवडणुकीत काँग्रेसच्या सभासदांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतल्याने या दोन्ही उमेदवारांना तीन अशी समान मते पडली. त्यामुळे चिठ्ठी काढून अध्यक्ष निवडण्याचा निर्णय घेण्यात आला. या वेळी उपमहापौर आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक आबा बागूल यांंच्याहस्ते चिठ्ठी काढण्यात आली, त्यात जगताप यांची चिठ्ठी निघाली. त्यामुळे आघाडी तुटली असली, तरी काँग्रेसच्या सदस्यानेच राष्ट्रवादीची चिठ्ठी काढल्याने सभागृहात चांगलाच हशा पिकला होता.