राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश
By Admin | Published: September 29, 2016 06:07 AM2016-09-29T06:07:24+5:302016-09-29T06:07:24+5:30
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का देण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर सुरेश शेवाळे, माजी
पुणे : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेसला आणखी एक धक्का देण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर सुरेश शेवाळे, माजी उपमहापौर दीपक मानकर यांचे चिरंजीव राघवेंद्र ऊर्फ बापू मानकर, राष्ट्रवादीचे खडकवासला मतदारसंघाचे माजी सरचिटणीस दिलीप वेडे-पाटील, विजय शेवाळे यांच्यासह धनकवडीतील गणेश भिंताडे व वडगावशेरीचे शैलेश बनसोडे यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये प्रवेशाचा सोहळा पार पडला. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह पश्चिम महाराष्ट्राचे संघटनमंत्री रवी अनासपुरे, शहराध्यक्ष योगेश गोगावले, जिल्हाध्यक्ष आमदार बाळा भेगडे, आमदार भीमराव तापकीर उपस्थित होते. औंध-खडकी, कोथरूड, खडकवासला, धनकवडी व वडगावशेरी भागांत पक्ष वाढविण्यास भाजपला मदत होणार आहे. पक्षांतरामुळे महापालिका निवडणुकीचे वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांचे चिरंजीव राघवेंद्र मानकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
दोन आठवड्यांपूर्वी मनसेचे नगरसेवक राजेंद्र बराटे व राष्ट्रवादीचे नगरसेवक दिलीप धाडवे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे फोटो प्रसिद्ध झाले होते. मात्र, पक्षाने कारवाईचा बडगा उचलण्याची तयारी सुरू करताच दोन्ही नगरसेवकांनी पक्षप्रवेशाचा इन्कार केला. त्यापाठोपाठ आता भाजपने आणखी एक धक्का दिला आहे. भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले म्हणाले, ‘‘राजकारणातील चांगल्या माणसांचा ओढा भाजपकडे वाढला आहे. ज्यांनी पक्षात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली, त्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला.’’
राघवेंद्र मानकर यांनी २०१२ साली काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविली होती. भाजपमध्ये जाण्याचा निर्णय त्याने वैयक्तिक पातळीवर घेतलेला आहे. या निर्णयाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अथवा माझ्याशी कोणताही संबंध नाही असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे नगरसेवक दीपक मानकर यांनी दिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमहापौर सुरेश शेवाळे यांच्या पक्ष सोडण्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसवर काही परिणाम होणार नाही. गेल्या ५ वर्षांपासून शेवाळे पक्षात सक्रिय नव्हते असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी स्पष्ट केले आहे.