डिजीटल व्यवहारांचा बट्ट्याबोळ : सुप्रिया सुळे यांची टीका; नोटाबंदीविरोधात राष्ट्रवादीचा पुण्यात मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 01:21 PM2017-11-08T13:21:47+5:302017-11-08T15:13:54+5:30
रस्त्यावर उतरून सर्वसामान्यांशी बोला, म्हणजे समस्या कळतील, अशी टिका राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी सरकारवर केली.
पुणे : नोटाबंदीनंतर डिजिटल व्यवहारांचा बट्ट्याबोळ झाला असून केवळ जाहिराती देऊन विकास होणार नाही. रस्त्यावर उतरून सर्वसामान्यांशी बोला, म्हणजे समस्या कळतील, अशी टिका राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी सरकारवर केली.
नोटाबंदीला १ वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीतर्फे पुण्यात निषेध मोर्चा सकाळी मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्यापासून मोर्चा काढण्यात आला़ या मोर्चात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते़.
अजित पवार यांनीही नोटाबंदीच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर टीका केली. ते म्हणाले, नोटाबंदीचा निर्णय सर्वसामान्यांना गरीब करणारा असून सरकार ‘हम करे सो कायदा’ या प्रमाणे वागत आहे. या निर्णयामुळे कोणीही समाधानी नसून नागरिक आपला रोष व्यक्त करीत आहेत. नोटाबंदी झाली तेव्हा आम्ही विरोध केला. त्यावेळी आंदोलनात कमी नागरिकांचा सहभाग होता. मात्र एक वर्षानंतर परिस्थिती बदलली असून नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. एवढेच नाही विद्यार्थ्यांचे सहभागाचे प्रमाणही मोठे आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही नोटाबंदीचा निर्णय चुकीचा असल्याची टीका केली, त्याची आठवण अजित पवार यांनी या वेळी करून दिली. नोटाबंदीमुळे देशाचा विकासदर घटला़ रद्द केलेल्या ९९ टक्के नोटा बँकांमध्ये परत आल्या़ मग काळा पैसा गेला कोठे? त्यांना जर काळा पैसा बाहेर आणायचा होता, तर २ हजार रुपयांची नोट का काढली?
रॅलीत नागरिकांनी नोटाबंदीविरोधात घोषणाबाजी केली. या वेळी फलकांच्या माध्यमातून निषेध करण्यात आला.