पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने वाहिली दोन हजार रुपयांच्या नोटांना श्रद्धांजली
By राजू हिंगे | Published: May 20, 2023 06:07 PM2023-05-20T18:07:19+5:302023-05-20T18:07:44+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पुण्यातील कार्यालयासमोर दोन हजार रूपयांच्या नोटांना श्रध्दांजली वाहिली...
पुणे : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करून दुसरी नोटबंदी केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पुण्यातील कार्यालयासमोर दोन हजार रूपयांच्या नोटांना श्रध्दांजली वाहिली. यावेळी “परत द्या परत द्या , नोटेतील चिप परत द्या" “चांगभल चांगभल नोटबंदीच्या नावाने चांगभल “ “यु टर्न सरकार… मोदी सरकार “ “नोटबंदी कशाला कसबा कर्नाटकचा बदला घ्यायला", या घोषणा दिल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख, बाळासाहेब बोडके, अजिंक्य पालकर, महिला शहराध्यक्ष मृणालिनी वाणी, सुषमा सातपुते, महेश हंडे, शालिनी जगताप, कुलदिप शर्मा, शुभम माताळे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
"केद्रांतील मोदी सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी काळा पैसा नष्ट करण्यासाठी नोटबंदी करुन पाचशे व हजार रूपयांच्या नोटा बंद केल्या होत्या, मात्र त्याचवेळी पहिल्यांदाच दोन हजार रूपयांची नोट चलनात आणली जवळजवळ सहा वर्षांनंतर ती नोटही चलनातून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला. आजवर नोटबंदीचा काय फायदा झाला हे कुठल्याही स्तरावर केंद्र सरकारला सिद्ध करता आलेले नाही, असे असताना पुन्हा ही दुसरी नोटबंदी जाहीर झाल्याने पहिल्या नोटबंदीचे फायदे सांगणाऱ्या शोक अनावर झाला आहे. आज ह्या नोटेचा श्रध्दांजली कार्यक्रम करण्यात आल्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले.