राष्ट्रवादीकडून पुणे महानगरपालिका निवडणुकीची तयारी; पालिकेत समाविष्ट गावांच्या समस्यासंदर्भात पदाधिकाऱ्यांची नेमणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2021 08:29 PM2021-07-04T20:29:40+5:302021-07-04T20:29:46+5:30
पालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या २३ गावांवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून लक्ष देण्यास सुरुवात
पुणे: राज्य शासनाच्या आदेशाने पालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या २३ गावांवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून लक्ष देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. आगामी पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने गावांमधील समस्यांसंदर्भात समन्वय साधण्याकरिता २३ पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
२३ गावांचा महानगरपालिकेत समावेश झाल्याने प्रशासकीय पातळीवर अडचण निर्माण होणार आहे. दैनंदिन कामांसाठी लोकप्रतिनिधींच्या संपर्काची आवश्यकता आहे. त्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या सभासदांना या २३ गावांच्या समन्वयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. येथील प्रशासकीय यंत्रणा सुरळीत होईपर्यंत नागरिकांच्या अडी-अडचणी, समस्या हे पदाधिकारी जाणून घेणार आहेत. तसेच, प्रशासकीय समन्वय साधून नागरिकांच्या अडचणी सोडविण्यात येणार आहेत.
गावातील नागरिकांच्या अडचणी जाणून घेणार
समाविष्ट गावांच्या समावेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. या निर्णयामुळे या गावांतील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमधील पदे संपुष्टात आली आहेत. पालिका निवडणुकीसाठी अद्याप कालावधी शिल्लक आहे. त्यातच विद्यमान लोकप्रतिनिधींची पदे संपुष्टात आल्याने या गावांमधील प्रशासकीय पातळीवर अडचण निर्माण होणार आहे. या गावांसाठी समन्वयाची जबाबदारी देण्यात आलेले पदाधिकारी गावाला भेट देऊन, नागरिकांच्या अडचणी जाणून घेतील. तसेच त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करतील.असे राष्ट्रवादी कांग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले.