दिसेल त्याला पक्षात घेण्याचे भाजप शिवसेनेचे धोरण हास्यास्पद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2019 03:35 PM2019-07-27T15:35:45+5:302019-07-27T15:40:41+5:30
'सक्तवसुली संचालनालयाच्या (इडी) चौकशीची भीती दाखवून साम, दाम, दंड, भेद वापरून पक्ष प्रवेश घडवले जात आहेत. बरं झालं आमच्यातल्या भाकड गायी जात आहेत. आता आम्ही ताज्या दमाच्या लोकांना संधी देऊ'.
पुणे : दिसेल त्याला पक्षात घेणे हे भाजप शिवसेनेचे धोरण हास्यास्पद असल्याची टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. पुण्यात ते बोलत होते.
आज पुण्यात आगामी विधानसभा निवडणुकांच्या उमेदवारीकरिता राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मुलाखती घेण्यात येत आहेत. पुणे आणि आजूबाजूच्या मतदारसंघांकरिता पाटील स्वतः मुलाखती घेत आहेत.त्यावेळी माध्यमांशी त्यांनी सध्या होत असलेल्या पक्षांतरावर टीका केली. मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमधून सर्वाधिक लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी भाजप किंवा सेनेची वाट धरत आहेत. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी आपली भूमिका मांडली आहे.
ते म्हणाले की, ' सक्तवसुली संचालनालयाच्या (इडी) चौकशीची भीती दाखवून साम, दाम, दंड, भेद वापरून पक्ष प्रवेश घडवले जात आहेत. बरं झालं आमच्यातल्या भाकड गायी जात आहेत. आता आम्ही ताज्या दमाच्या लोकांना संधी देऊ'.
पुढे ते म्हणाले की, 'युतीत मुख्यमंत्री कोण अशी स्पर्धा सुरु आहे. युती एकच असताना दोन मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा सुरु आहे'. हा प्रकार पहिल्यांदाच बघत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.