राष्ट्रवादीचा दणदणीत विजय अन् शिवसेनेचा पराभव; उपसभापतीपदी अनिल टिळेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2021 04:38 PM2021-11-08T16:38:52+5:302021-11-08T17:06:07+5:30
शिवसेनेच्या सिमा पढेर यांचा १० विरूद्ध १ मतांनी पराभव केला आहे
लोणी काळभोर : हवेली पंचायत समिती उपसभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल टिळेकर यांची निवड झाली आहे. त्यांनी शिवसेनेच्या सिमा पढेर यांचा १० विरूद्ध १ मतांनी पराभव केला आहे. त्यामुळे उपसभापतीपदी माळ टिळेकर यांच्या गळ्यात पडली आहे.
हवेली पंचायत समितीत एकूण १४ सदस्य आहेत. त्यापैकी ८ सदस्य राष्ट्रवादी कॉग्रेसचे ४ शिवसेनेचे तर भारतीय जनता पक्षाचे २ सदस्य असल्याने येथे राष्ट्रवादी काँग्रेस बहुमतात आहे. आज प्रत्यक्ष निवडणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ८ भारतीय जनता पक्षाचे १ व शिवसेनेचे ३ सदस्य उपस्थित होते.
प्रांताधिकारी संजय आसवले यांच्या अध्यक्षतेखाली व गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के यांचे उपस्थितीत पार पडलेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून अनिल टिळेकर यांनी तर शिवसेनेच्या वतीने सिमा पढेर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. सदर निवड बिनविरोध व्हावी म्हणून उपस्थितांनी प्रयत्न केले परंतू निर्धारीत वेळेत पढेर यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला नाही. म्हणून निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली.
आज प्रत्यक्षात १४ पैकी १२ सदस्य उपस्थित होते. यापैकी एकजण तटस्थ राहिल्याने ११ जण मतदानात सहभागी झाले होते. यामध्ये टिळेकर यांना १० तर पढेर यांना फक्त १ मत पडले. यामुळे शिवसेना व भारतीय जनता पक्षाचे प्रत्येकी एका सदस्याने टिळेकर यांना मत दिलेचे सिद्ध झाले आहे. महाराष्ट्रात आघाडीचे सरकार असल्याने शिवसेनेच्या पढेर या माघार घेतील अशी सर्वांची अपेक्षा होती. परंतू सर्वांचा अपेक्षाभंग झाला.
टिळेकर यांची उपसभापतीपदी निवड होताच शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष भारती शेवाळे, हवेली तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष सुभाष टिळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना नवनिर्वाचित उपसभापतीपदी अनिल टिळेकर म्हणाले, उर्वरित कालावधीत मिळालेल्या संधीचे सोने करून जास्तीत जास्त लोकोपयोगी कामे करून आपण जनतेची सेवा करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत.