“दिवाळीनंतर बॉम्ब फोडण्यापेक्षा फडणवीसांनी दिल्लीत जाऊन लोकांसाठी तोंड उघडावे”
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2021 09:53 PM2021-11-04T21:53:08+5:302021-11-04T21:53:56+5:30
राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला लगावला आहे.
पुणे: गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि भाजपमध्ये अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या आरोपांना उत्तर देताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार असल्याचा पलटवार केला होता. यावरून आता राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला लगावला आहे. दिवाळीनंतर बॉम्ब फोडण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन लोकांसाठी तोंड उघडावे, असे म्हटले आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात ड्रग्जचा खेळ सुरू केल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला होता. याला उत्तर देताना नवाब मलिकांनी लवंगी फटाका फोडला आहे. दिवाळीपर्यंत थांबा, दिवाळीनंतर मी बॉम्बच फोडणार आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. या प्रकरणी रोहित पवारांनी प्रतिक्रिया देताना फडणवीसांना टोला लगावला.
शरद पवार हे योद्धे, त्यांच्यामागे जनतेची ताकद
राज्यात महाविकास आघाडी सरकार चांगले काम करत आहे. त्यामुळे विरोधकांचा पोटशूळ उठला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीनंतर बॉम्ब फोडण्याऐवजी दिल्लीत जाऊन लोकांसाठी तोंड उघडावे. लोकांची कामे तरी होतील. पवार कुटुंब ईडी, सीबीआय अशा कारवायांना बधणार नाही. शरद पवारांविरोधात कुणीतरी ट्रकभर पुरावे घेऊन येणार होते, त्याचे काय झाले? शरद पवार योद्धे आहेत आणि त्यांच्यामागे जनतेची ताकद आहे. पवार कुटुंबावर होत असलेल्या कारवायांकडे आम्ही लक्षही देत नाही, असा पलटवार रोहित पवार यांनी केला आहे.
दरम्यान, समीर दाऊद वानखेडे जो गेल्या १४ वर्षांपासून या शहरात वेगवेगळ्या विभागांमध्ये काम करतो आहे. त्यांच्याही बदलीमागे राज्याचे माजी मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांना यासाठीच आणले गेले होते की त्यांनी पल्बिसीटी करुन निर्दोष लोकांना फसवावे. ड्रग्जचा खेळ मुंबई, गोव्यात सुरु राहावा. राज्यात सर्व ड्रग्जचा खेळ हा देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावर सुरु आहे, असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला होता.