आंबेगावला जोडलेल्या शिरूरच्या ३३ पैकी २९ गावात राष्ट्रवादीची सत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:10 AM2021-03-05T04:10:45+5:302021-03-05T04:10:45+5:30
रांजणगाव गणपती : आंबेगाव विधानसभा मतदारसंघाला जोडलेल्या शिरूर तालुक्यातील ३९ पैकी ३३ ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. या ३३ ग्रामपंचायतींपैकी ...
रांजणगाव गणपती : आंबेगाव विधानसभा मतदारसंघाला जोडलेल्या शिरूर तालुक्यातील ३९ पैकी ३३ ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. या ३३ ग्रामपंचायतींपैकी २९ गावांतील ग्रामपंचायतीवर कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व सिद्ध झाले असून, राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला असल्याचा दावा आंबेगाव-शिरूर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
मानसिंग पाचुंदकर म्हणाले, शिरूर तालुक्यातील ३९ गावे आंबेगाव विधानसभा मतदारसंघाला जोडली गेलेली आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या गावातील निवडणूका लढण्यात आल्या. कामगारमंत्री वळसे पाटील यांचा प्रत्येक गावातील ग्रामस्थांशी, पक्षाच्या कार्यकर्त्यांशी असलेला थेट संपर्क व त्यामाध्यमातून होणाऱ्या विकासकामाच्या जोरावर ३३ पैकी २९ ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आली. कामगारमंत्री वळसे पाटील यांनी गेल्या ११ वर्षांत शिरूरमधील ३९ गावांमध्ये केलेली भरीव विकासकामे आणि शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे, सूर्यकांत पलांडे, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रकाश पवार यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केलेल्या कामांमुळे पक्ष संघटना मजबूत होण्याबरोबरच ग्रामपंचायत निवडणुकीतील विजय सुकर झाला.
आंबेगाव मतदारसंघाला शिरूर तालुक्यातील जोडलेल्या २९ ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरपंच व उपसरपंच निवडी झाल्या असून, २ ग्रामपंचायतीमध्ये महाविकास आघाडीचे पदाधिकारी विराजमान झाल्याचे सांगत पाचुंदकर म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आलेल्या २९ ग्रामपंचायतीतील सरपंच, उपसरपंच व सर्व नूतन सदस्यांचा सत्कार व मतदार आभार मेळावा कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत लवकरच आयोजित केला जाणार असल्याचे सांगितले. यावेळी युवा उद्योजक अनिल दुंडे, गणेश लांडे, विठ्ठल नळकांडे उपस्थित होते.