Maharashtra Political Crisis: “नागपुरात पराभव दिसू लागल्याने पुण्यात चाचपणी?”; रुपाली ठोंबरेंचा फडणवीसांवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 01:06 PM2022-08-19T13:06:25+5:302022-08-19T13:07:58+5:30
Maharashtra Political Crisis: २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीसांना पुण्यातून उमेदवारी देण्याची मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने केल्याचे सांगितले जात आहे.
पुणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे नवे सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीचे नेते सातत्याने टीका करताना पाहायला मिळत आहेत. यातच आता देवेंद्र फडणवीस यांचा भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीत समावेश करण्यात आला आहे. यामुळे देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. यातच देवेंद्र फडणवीस यांना पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची मागणी ब्राह्मण महासंघाने केली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांनी देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला लगावला आहे.
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने जे.पी. नड्डा यांना पाठवलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमनांचा वर्षाव करण्यात आला आहे. या पत्रानंतर रुपाली ठोंबरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
नागपुरात पराभव दिसू लागल्याने पुण्यात चाचपणी?
रुपाली पाटील-ठोंबरे यांनी यासंदर्भात फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये, ओळखा पाहू? जनाधार गमावल्याने पुण्यात चाचपणी, असा टोला लगावत सत्ता आल्यावर धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेट मध्ये आरक्षण देणार, वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही, उपमुख्यमंत्री पद हे असंविधानीक आहे, अशा प्रकारचे ज्ञान महाराष्ट्राला देनारे , फसवणीस पणा व अकार्यक्षमता यामुळे भाजपाने मुख्यमंत्री पदी नाकारलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करणारे एक मंत्री यांचा खरा चेहरा उघडा पडला आहे म्हणून नागपूर मध्ये पराभव दिसू लागल्याने पुण्यात चाचपणी करताय म्हणे?, अशी खोचक विचारणा या पोस्टमधून करण्यात आली आहे.
पुणे कर जनता हुशार आहे!
पुणेकर जनता हुशार आहे ! कुठलेही कर्तृत्व नसताना वडील व चुलतीच्या अर्थातच घरणेशाहीच्या पुण्याईवर स्वतःच्या राक्षशी महत्वकांक्षेसाठी स्वतःच्या पक्षातील बहुजन नेत्यांना राजकारणात संपवून सत्तापदे मिळवणाऱ्याना शिवजन्मभूमी पुणेरी विसर्जन करायला आतुर आहे, या शब्दांत रुपाली पाटील-ठोंबरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे.