आम्हाला भाजपसारखी सुपाऱ्या घेण्याची सवय नाही : राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकरांचं प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 08:27 PM2021-09-08T20:27:18+5:302021-09-08T20:38:38+5:30
वर्ध्याचे भाजपचे खासदार रामदास तडस यांचे चिरंजीव पंकज तडस यांनी अखेर पूजाशी लग्न केलं आहे. लग्नानंतर पंकज यांनी काही लोकांनी राजकीय सुपाऱ्या घेऊन आम्हाला बदनाम केल्याचा आरोप केला होता
पुणे : मी पूर्वीही खूश होतो, आताही खूश आहे. मी आधी जे केलं होतं. त्यावर ठाम होतो, आताही ठाम आहे आणि पुढेही ठाम राहील. पंकज तडस हा खासदाराचा मुलगा म्हणून काही लोकांनी राजकीय सुपारी घेतली होती. ती कंपल्सरी मिटली आहे अशा शब्दात भाजप खासदार रामदास तडस यांचे चिरंजीव पंकज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. पण पंकज यांच्या टीकेला चाकणकरांनी प्रत्युत्तर दिले आहे. पूजाने तिच्यावर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडणारा व्हिडीओ व्हायरल केल्यामुळेच पंकज यांना पूजाशी लग्न करावं लागलं असे मत व्यक्त करतानाच आम्हाला भाजपसारखी सुपाऱ्या घेण्याची सवय नाही असा जोरदार हल्लाबोल केला आहे.
वर्ध्याचे भाजपचे खासदार रामदास तडस यांचे चिरंजीव पंकज तडस यांनी अखेर पूजाशी लग्न केलं आहे. लग्नानंतर पंकज यांनी काही लोकांनी राजकीय सुपाऱ्या घेऊन आम्हाला बदनाम केल्याचा आरोप केला होता. त्याच पार्श्वभूमीवर रुपाली चाकणकर यांनी पंकज तडस यांना प्रत्युत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या, पूजाने तिच्यावर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडणारा व्हिडीओ व्हायरल केला म्हणूनच पंकज यांना पूजाशी लग्न करावं लागलं. पण आम्हाला भाजपसारखी सुपाऱ्या घेण्याची सवय नाही.
काय आहे प्रकरण ?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी वर्ध्याचे भाजपाचे खासदार रामदास तडस यांची सून पूजा हिचा एक धक्कादायक व्हिडिओ ट्विट केला होता. व्हिडिओत दिसणारी महिला रामदास तडस यांच्या सून असल्याचं चाकणकर यांनी ट्विटमध्ये नमूद केलं असून त्यांच्या सुनेनं आपल्यावर कुटुंबाकडून अन्याय होत असल्याचा आरोप केला आहे. व्हिडिओत रडत रडत त्या राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर यांच्याकडे मदतीची विनवणी करत असल्याचं दिसून येत आहे.
रामदास तडस यांच्या सुनेनं बनवलेला व्हिडिओ राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर यांनी ट्विट केला आहे. यात संबंधित महिला रुपाली चाकणकर यांच्या मदतीचं आवाहन करत असून आपल्या जीवाला धोका असल्याचं व्हिडिओत म्हटलं आहे. "वर्धा भाजप खासदार रामदास तडस यांच्या सुन गेली अनेक दिवस हे तडस कुटुंब मारहाण करुन अत्याचार करीत आहेत. पुजाचा आताच हा व्हिडिओ माझ्यापर्यंत आला आहे. तातडीने पोलीस आयुक्तांशी संपर्क साधला आहे. माझ्या पदाधिकारी व पोलीस संरक्षणासाठी पोहोचले आहेत", असं रुपाली चाकणकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.