जागावाटपावरून राष्ट्रवादीत दुफळी!

By admin | Published: May 4, 2017 01:47 AM2017-05-04T01:47:47+5:302017-05-04T01:47:47+5:30

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या २० मे रोजी होत असलेल्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या पॅनेलमध्ये जागावाटपाच्या मुद्यावरून

NCP sect divisions | जागावाटपावरून राष्ट्रवादीत दुफळी!

जागावाटपावरून राष्ट्रवादीत दुफळी!

Next

शिरूर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या २० मे रोजी होत असलेल्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या पॅनेलमध्ये जागावाटपाच्या मुद्यावरून दुफळी निर्माण झाली. आमदार दिलीप वळसे-पाटील व माजी आमदार अ‍ॅड. अशोक पवार यांच्या समन्वय बैठकीत ठरल्याप्रमाणे जागावाटप झाले नसून अ‍ॅड. पवार यांनी वळसे-पाटील यांना डावलून एन. टी. ओबीसीची जागा दुसऱ्यांना दिल्याचे राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांपैकी एका नेत्याने सांगितले.
शिरूर तालुक्यातील ३९ गावे ही आंबेगाव विधानसभा मतदारसंघात समाविष्ट करण्यात आली आहेत. या ३९ गावांचा मिळून राष्ट्रवादीचा वेगळा पॅनेल टाकायचा. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्या वेळी माजी आमदार अ‍ॅड. पवार, पोपटराव गावडे, बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार यांनी राष्ट्रवादीचा एकच पॅनेल असेल, असे स्पष्ट केले होते. आज उमेदवारांचे चिन्हवाटप होते. राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलला छत्री चिन्ह मिळाले. ३९ गावांतील पाच उमेदवार वगळता राष्ट्रवादीच्या इतर उमेदवारांनी वेळेत येऊन छत्री चिन्ह घेतले. मात्र प्रकाश पवार, मानसिंग पाचुंदकर, शंकर जांभळकर, बाबाजी निचीत, कौत्सल्या भोर हे पाच जण वेळेत न आल्याने त्यांना दुसरे चिन्ह मिळाले.
पाच जणांनी वेगळे चिन्ह स्वीकारले. इथेच राष्ट्रवादीतील दुफळीचा प्रत्यय आला. याबाबत माजी आमदार पोपटराव गावडे म्हणाले, की जागावाटपासंदर्भात अ‍ॅड. पवार यांनी आम्हाला विश्वासात घेतले नाही. दिलीप वळसे-पाटील यांच्या शब्दालाही अ‍ॅड. पवार यांनी मान दिला नाही. हा वळसे-पाटील यांचा अपमान करण्याचा प्रकार आहे. यामुळे आमच्या ३९ गावांतील ५ उमेदवारांनी निवडणूक प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा विचार केला आहे. वळसे-पाटील यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल. गावडे यांच्या या वक्तव्याने राष्ट्रवादीतील मतभेद स्पष्ट झाले. माजी सभापती प्रकाश पवार यांनी मात्र सावध प्रतिक्रिया दिली. त्यांनी एन. टी. व ओबीसीच्या जागेवरून वाद निर्माण झाल्याचे उमेदवार बदलल्याचे कबूल केले. मात्र वळसे-पाटील यांच्याशी चर्चा केल्यावरच पुढील भूमिका ठरवू, असे स्पष्ट केले. आमचा (राष्ट्रवादीचा) एकच पॅनेल असेल, असे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र अ‍ॅड. पवार यांच्या नेतृत्वाबाबत त्यांनी बोलायचे टाळले.एक महिन्यापूर्वी ‘लोकमत’ला प्रतिक्रिया देताना प्रकाश पवार यांनी राष्ट्रवादीच्या पॅनेलचे नेतृत्व अ‍ॅड. पवार हेच करतील, असे स्पष्ट केले होते. आज मात्र ज्या पाच जणांनी अ‍ॅड. पवार यांच्या नेतृत्वावर अविश्वास व्यक्त केला. त्यात प्रकाश पवार यांचा समावेश आहे, हे विशेष (ही बाब ते नाकारत असले तरी) असेल, असे स्पष्ट असले तरी निर्माण झालेली दुफळी येत्या काही दिवसांत भरून निघेल हा प्रश्न आहे. ३९ गावांत गावडे व माजी सभापती पवार यांचे वर्चस्व आहे. राष्ट्रवादीचा पॅनेल निवडून आणण्यात गावडे यांची भूमिका महत्त्वाची ठरली असल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे.

राष्ट्रवादीतील दुफळीबाबत जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे यांना विचारले असता, त्यांनी तालुकाध्यक्षांकडून, नेत्यांकडून माहिती घेतो, असे उत्तर दिले. अ‍ॅड. पवार यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला. दुफळी राष्ट्रवादीत पडली. याबाबत भाजपाची मंडळीच पत्रकारांना माहिती देत होती. भाजपाच्या तालुकाध्यक्षाने याबाबत पत्रकारांना फोन केले, हे विशेष. राष्ट्रवादीतील दुफळीचा भाजपाला फायदा होण्याची शक्यता आहे.

Web Title: NCP sect divisions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.