बारामतीकरांसमोर शरद पवारांनी केलं लेकीचं कौतुक; सुप्रिया सुळेंबद्दल म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 10:09 PM2024-03-22T22:09:58+5:302024-03-22T22:16:20+5:30
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना पायाला भिंगरी बांधली असून ते मतदारसंघ पिंजून काढत आहेत.
NCP Sharad Pawar ( Marathi News ) : बारामती लोकसभा मतदारसंघात मागील तीन टर्मपासून खासदार असलेल्या सुप्रिया सुळे यांच्यासाठी यंदाची निवडणूक अत्यंत आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्याविरोधात या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांचा विजय सुकर व्हावा, यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना पायाला भिंगरी बांधली असून ते मतदारसंघ पिंजून काढत आहेत. आज पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत स्वाभिमानी व्यापारी महासंघाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना शरद पवारांनी आपल्या खासदार असलेल्या कन्येचं कौतुक करत मतदारांना साथ देण्याचं आवाहन केलं आहे.
मेळाव्यात बोलताना शरद पवार म्हणाले की, "लोकांचं दुखणं मांडणारे जे खासदार आहेत त्यामध्ये तुमच्या खासदाराचे नाव हे फार वर आहे, त्यामुळे अशा व्यक्तीला तुम्ही लोकांनी यापूर्वी निवडून दिलं, ती संधी या ही वेळेला द्याल अशा प्रकारची अपेक्षा करतो," अशा शब्दांत शरद पवार यांनी लेकीवर स्तुतीसुमने उधळली. तसंच "खूण बदलली, कोर्टामध्ये काही गोष्टी गेल्या आणि सुप्रीम कोर्टाने व निवडणूक आयोगाने तुतारी वाजवणारा माणूस ही नवीन खूण दिलेली आहे, ती तुमच्या लक्षात ठेवावी लागेल, तिच्या पुढील बटण दाबलं पाहिजे आणि तुम्हा लोकांच्या मनात जे आहे ते त्यानिमित्ताने आपल्या बटण दाबण्यातून तुम्ही व्यक्त करावं," असं आवाहनही पवारांनी केलं आहे.
बारामतीतील व्यापाऱ्यांना कोणत्या शब्द दिला?
व्यापारी महासंघाच्या मेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी नव्याने तयार करण्यात आलेल्या संघटनेला बळ देण्याचं आश्वासन दिलं आहे. "कुठलाही देश, कुठलेही राज्य, कुठलाही तालुका हा पुढे न्यायचा असेल तर व्यापार वाढला पाहिजे, व्यवहार वाढला पाहिजे. त्यामध्ये दोन भाग आहेत एक मोठा व्यापार करणारे लोक, दुसरे छोटे लोक. आजपर्यंत बारामतीमध्ये व्यापारी संघटना अनेक वर्षे काम करत आहेत. पण त्यामध्ये छोट्या लोकांचा विचार हा कमी होता, ही भूमिका आम्हा लोकांच्या आता लक्षात आली. श्रीयुत सस्ते व श्रीयुत पाटणकर या लोकांनी पुढाकार घेऊन नवी संघटना बांधली. याच्यात लाखात व्यवहार करणारा कोणीही नसे, हजारात व्यवहार करणारे असे. हे छोटे व्यापारी शेवटी आपले कुटुंब चालवतात, गावाची अर्थव्यवस्था मजबूत करण्याला हातभार लावतात. म्हणून या छोट्या व्यापाऱ्यांची एक संघटना असावी या दृष्टीने स्वाभिमानी व्यापारी महासंघ ही संस्था आज या ठिकाणी उभी राहिली. संस्था स्थापन करण्यामध्ये ज्यांनी पुढाकार घेतला त्यांना एकच गोष्ट सांगायची आहे की हे लहान व्यावसायिक आहेत. त्यांच्या अडचणीत अधिक लक्ष घाला, जिथे त्यांच्या अडचणीसंबंधी सोडवायला तुम्हाला काही मर्यादा आल्या तर आम्हा लोकांना कॉन्टॅक्ट करा. आमची शक्ती व पाठिंबा हा छोट्यांच्या पाठीमागे राहील. मला बारामती व सबंध महाराष्ट्राचा छोटा-मोठा उद्योग, व्यापार, हा वाढवायचा आहे. हा वाढवणं याचा अर्थ आर्थिक दृष्ट्या राज्य समृद्धीच्या दिशेने जाणं. ते काम करायचं असेल तर आपल्याला प्रयत्न करावे लागतील. हे संघटन तुम्ही उभं केलं; आता निवडणुकीची प्रक्रिया आहे ती संपल्यानंतर पुन्हा एकदा आपण बसू," असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.