देश काँग्रेसमुक्त होणार नाही, भारताला पुढे न्यायचे असेल तर काँग्रेस हवी: शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 09:28 AM2022-12-29T09:28:26+5:302022-12-29T09:31:00+5:30
देशातील काही धर्मांध शक्ती काँग्रेसमुक्त भारत करण्याचे स्वप्न पाहत आहेत. परंतु काँग्रेसशिवाय भारत होऊ शकत नाही, असे शरद पवार म्हणाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : देशातील काही धर्मांध शक्ती काँग्रेसमुक्त भारत करण्याचे स्वप्न पाहत आहेत. ते देशात काँग्रेसबद्दल द्वेषाची भावना पसरवण्याचे काम करत आहेत. मात्र, काँग्रेसमुक्त भारत कधीही होणार नाही. देशाला आज आणि पुढेही काँग्रेस आणि काँग्रेस विचाराची गरज आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.
काँग्रेस पक्षाच्या १३७ व्या वर्धापन दिनानिमित्त काँग्रेस भवन येथे बुधवारी आयोजित स्नेहमेळाव्यास शरद पवार यांनी हजेरी लावली. यावेळी कोल्हापूरचे शाहू महाराज छत्रपती, खासदार श्रीनिवास पाटील, काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, रिपाइंसह विविध सामाजिक व राजकीय कार्यकर्ते उपस्थित होते.
पवार म्हणाले, मी २४ वर्षांनंतर या वास्तूत आलो, याचा आनंद आहे. प्रत्यक्षात पुण्यात काँग्रेसची स्थापना होणार होती. मात्र, प्लेगमुळे पुण्यातील बैठक रद्द करून ती मुंबईला झाली. स्वातंत्र्यानंतर पुण्यातून प्रदेश काँग्रेसचे काम चालत होते. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीमध्ये काँग्रेसचे मोठे योगदान आहे.
काही जण काँग्रेसमुक्त भारत करण्याची भाषा करतात; परंतु काँग्रेसशिवाय भारत होऊ शकत नाही. भारताला पुढे न्यायचे असेल तर काँग्रेस सोबत हवी. आजच्या सत्तेचा विचार देशात विषमतेला खतपाणी घालणारा आहे. एकत्र येऊन या शक्तीविरोधात लढा देण्याचा निर्णय घेतला आहे, असेही त्यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"