राष्ट्रवादी विद्यार्थी काॅंग्रेस आणि भाजप युवा माेर्चाचे कार्यकर्ते समाेरासमाेर ; फर्ग्युसनमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 04:34 PM2019-12-23T16:34:02+5:302019-12-23T16:36:03+5:30
राष्ट्रवादी विद्यार्थी काॅंग्रेस आणि भाजप युवा माेर्चाचे कार्यकर्ते समाेरासमाेर आल्याने फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले हाेते.
पुणे : जामिया मिलीया आणि अलाहाबाद विद्यापीठातील व देशभरातील विद्यार्थ्यांना झालेल्या अमानुष मारहानीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी विद्यार्थी काॅंग्रेसच्यावतीने पुण्यातील महाविद्यालये बंदची हाक देण्यात आली हाेती. यावेळी फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये निदर्शने सुरु असताना राष्ट्रवादी विद्यार्थी काॅंग्रेस आणि भाजप युवा माेर्चाचे कार्यकर्ते एकमेकांसमाेर आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले हाेते.
सीएए आणि एनआरसी या कायद्यांना विराेध करण्यासाठी देशभरामध्ये आंदाेलने हाेत आहेत. या आंदाेलनांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग जास्त असून देशातील अनेक विद्यापीठांमध्ये या कायद्याविराेधात आंदाेलने करण्यात आली आहेत. जामिया मिलीया विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या आंदाेलनाला हिंसक वळण लागले हाेते. विद्यार्थ्यांनी हिंसाचार केल्याचा पाेलिसांचा आराेप हाेता तर पाेलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात अनेक विद्यार्थी जखमी झाले हाेते. याच घटनेचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काॅंग्रेसच्या विद्यार्थ्यांनी पुणे शहरातील महाविद्यालये बंद ठेवण्याची हाक दिली हाेती. यावेळी फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी काॅंग्रेस आणि भाजप युवा माेर्चाचे कार्यकर्ते समाेरासमाेर येऊन घाेषणाबाजी करु लागल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर पाेलिसांनी हस्तक्षेप केल्याने प्रकरण निवळले.
याबाबत बाेलताना राष्ट्रवादी विद्यार्थी काॅंग्रेसचा प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील म्हणाला, आज आम्ही जामिया मिलीया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा विराेध करण्यासाठी फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये जमलाे हाेताे. आम्ही प्राचार्यांना आमच्या मागण्यांचे निवेदन देणार हाेताे. परंतु प्राचार्य आम्हाला लवकर भेटले नाहीत. त्यावेळी त्यांच्या दालनाबाहेर बसून आम्ही आंदाेलन करत असताना तिकडे भाजप युवा माेर्चाचे कार्यकर्ते आले. त्यांनी येऊन घाेषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे आमच्याकडून सुद्धा घाेषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर प्राचार्य येत त्यांनी आमचे निवदेन स्विकारले. आम्ही प्राचार्यांना महाविद्यालय बंद करण्याची विनंती केली हाेती. परंतु फर्ग्युसन महाविद्यालय हे संघाच्या विचारांचे असल्याने त्यांनी महाविद्यालय बंद करण्यास विराेध केला. आम्ही शांततापूर्वक आंदाेलन करत हाेताे, परंतु भाजप युवा माेर्चाचे कार्यकर्ते तेथे घेत त्यांनी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.
भाजप युवा माेर्चाचा सरचिटणीस पुनीत जाेशी म्हणाला, राष्ट्रवादी विद्यार्थी काॅंग्रेसचे विद्यार्थी आज विविध महाविद्यालयांमध्ये जाऊन बंद पुकारणार असल्याचे आम्हाला समजले. महाविद्यालये बंद करण्यासारखी ताणाशाही आम्ही सहन करणार नाही. विराेध करण्याचा विद्यार्थ्यांना हक्क आहे. परंतु काॅलेजमध्ये जाऊन प्रशासनाला काॅलेजबंद करण्यास सांगणे चुकीचे आहे. अशा गाेष्टी आम्ही खपवून घेणार नाही. राष्ट्रवादी विद्यार्थी काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांना सांगणे आहे की त्यांनी महाविद्यालयांमधील वातावरण खराब करु नये. त्यांनी जामिया मिलीया आणि इतर महाविद्यालयांमध्ये जाऊन ती बंद करुन दाखवावीत.