APMC Election: पुण्यात हवेली बाजार समितीच्या निवडणूकीत राष्ट्रवादीला धक्का; बंडखोरी भोवली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 06:45 PM2023-04-29T18:45:11+5:302023-04-29T18:47:17+5:30
सर्वपक्षीय पॅनलचा सर्वाधिक १३ जागांवर विजय, तर राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलने 2 जागांवर विजय मिळविला
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्यात आणि जिल्ह्यातील बाजार समित्यांवर विजयी पताका फडकाविणार्या राष्ट्रवादीला पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीतील बंडखोर आणि भाजपच्या पॅनलने १८ जागांपैकी १३ जागांवर विजय मिळविला आहे. तर राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलने 2 जागांवर विजय मिळविला. तीन जागावर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. राष्ट्रवादीला बंडखोरी भोवली असून अंतर्गत वादाचा मोठा फटका या निवडणुकीत बसला आहे. या निवडणूकीच्या निमित्ताने भाजप आणि ठाकरे गटाचा बाजार समितीत प्रवेश झाला आहे.
तब्बल २४ वर्षानंतर पार पडलेल्या या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलचा राष्ट्रवादीच्या बंडखोरांनी भाजपच्या मदतीने अक्षरश: धुव्वा उडविला आहे. या निवडणुकीत अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी सर्वपक्षीय पॅनलला 18 पैकी 13 जागा जिंकण्यामध्ये यश आले आहे. तर 2 जागांवर राष्ट्रवादी पुरस्कृत अण्णासाहेब मगर सहकार पॅनल विजयी झाले आहे. या व्यतिरिक्त 3 जागावर स्वतंत्र उमेदवार विजयी झाले आहेत. हे तीनही उमेदवार राष्ट्रवादीशी संबंधित आहेत. पर्वपक्षीय पॅनलमध्ये भाजपचे 3, तर ठाकरे गटाच्या 3 उमेदवारांचा समावेश आहे.
राष्ट्रवादीचे अधिकृत पॅनलची घोषणा केल्यानंतर पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विकास दांगट यांनी विरोधी पॅनलला मदत करत असल्याचे कारण देत जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दांगट यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. त्यामुळे राष्ट्रवादीत दोन गट पडले होते. पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर दागंट यांनी सर्वपक्षीय पॅनलसाठी सर्व ताकद पणाला लावली होती. तसेच पक्षातून हकालपट्टी झाली, तरी मी राष्ट्रवादीचाच आहे. असा प्रचार विकास दांगट यांनी केला होता. त्यामुळे त्यांना काही प्रमाणात सहानभूती मिळाली होती. त्यांना काही भाजप पदाधिकार्यांची साथ मिळाली. त्यामुळे राष्ट्रवादीतील बंडखोरांनी भाजपच्या मदतीने या निवडणूकीत दणदणीत विजय मिळविला. या निवडणूकीत अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला. ग्रामपंचायत गटातून रामकृष्ण सातव, सुदर्शन चौधरी, नानासाहेब आबनावे व रवींद्र कंद विजयी झाले आहेत. या गटात महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे पराभूत झाले आहेत.
१८ जांगासाठी ही निवडणूक पार पडली. त्यात सर्वाधिक सेवा, सोसायटी गटात ११ जागा होत्या. ग्रामपंचायत गटात ४ जागा, आडते व व्यापारी गटात २ जागा, तर कामगार गटात १ जागा होती. कामगार गटातील विजयी उमेदवार संतोष नांगरे हे राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलचे शहराध्यक्ष आहेत. तर व्यापारी गटातील गणेश घुले व बापु भोसले हे राष्ट्रवादीशी संबंधित आहेत. सेवा सहकारी सोसायटी गटातून रोहिदास उंद्रे, नितीन दांगट, प्रकाश जगताप, प्रशांत काळभोर, राजाराम कांचन, दत्तात्रय पायगुडे, दिलीप काळभोर, केसकर लक्ष्मण, शशिकांत गायकवाड, मनीषा हरपळे, सारिका हरगुडे विजयी झाले आहेत.
स्वतंत्र तीन विजयी उमेदवार राष्ट्रवादीचे?
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत व्यापारी आडते मतदार संघातील दोन जागांवर जय शारदा गजानन पॅनलचे गणेश घुले आणि अनिरुद्ध भोसले विजयी झाले. या दोन्ही विजयी उमेदवारांनी स्वतंत्र निवडणूक लढविली होती. कामगार गटातील विजयी उमेदवार संतोष नांगरे यांनी स्वतंत्र निवडणूक लढविली असली, तरी नांगरे हे राष्ट्रवादीचे अधिकृत पदाधिकारी आहेत. तर गणेश घुले आणि अनिरुद्ध भोसले हे राष्ट्रवादीशी संबंधित आहेत. त्यामुळे स्वतंत्रपणे विजयी झालेले तीनही उमेदवार राष्ट्रवादीचे असल्याची चर्चा आहे.