‘राष्ट्रवादी’ने उचलली पूजाच्या शिक्षणाची जबाबदारी, तर ‘भाजप’ने घेतली लग्नाची जबाबदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:09 AM2021-07-11T04:09:09+5:302021-07-11T04:09:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क केडगाव : एमपीएसी परीक्षा उत्तीर्ण होऊनही पोस्टिंग न मिळाल्याने व कुटुंबावरील कर्जामुळे केडगाव येथील स्वप्निल ...
लोकमत न्यूज नेटवर्क
केडगाव : एमपीएसी परीक्षा उत्तीर्ण होऊनही पोस्टिंग न मिळाल्याने व कुटुंबावरील कर्जामुळे केडगाव येथील स्वप्निल लोणकर या तरुणाने आत्महत्या केली हाेती. त्याच्या कुटुंबीयांना दिलासा देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे स्वप्निलची बहीण पूजाच्या शिक्षणाची आणि लोणकर कुटुंबीयांच्या कर्जाची, तर भाजपतर्फे तिच्या लग्नाची जबाबदारी घेण्यात आली आहे.
केडगाव
संपूर्ण राज्यभर गाजत असलेल्या एम.पी.एस.सी. उत्तीर्ण मृत विद्यार्थी स्वप्निल लोणकर यांच्या कुटुंबाला शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप पक्षाने दिलासा दिला आहे. शनिवारी स्वप्निल लोणकर यांच्या कुटुंबीयांना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे व व भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपल्या समर्थकांसह भेट दिली. स्वप्निलची आई छाया लोणकर, वडील सुनील लोणकर, आजी अंजना लोणकर, बहीण पूजा लोणकर यांनी उपस्थितांसमोर अश्रूंना वाट मोकळी करून दिली. राष्ट्रवादीच्या आमदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, आप्पासाहेब पवार, राणी शेळके, वैशाली नागवडे, डॉक्टर वंदना मोहिते, झुंबर गायकवाड, तुषार थोरात, दिलीप हंडाळ, विकास खळदकर, अनिल नागवडे व अजित शितोळे यांचा समावेश होता. तर गोपीचंद पडळकर यांच्या समवेत दौंडचे आमदार राहुल कुल यांनी दुसऱ्यांदा लोणकर कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी केडगावचे सरपंच अजित शेलार, किरण देशमुख, नितीन जगताप, आबा चोरमले आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी दोन्ही पदाधिकाऱ्यांना समोर लोणकर कुटुंबीयांना अक्षरशः रडू कोसळले. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, प्रत्येक संकटावर आत्महत्या हा शेवटचा पर्याय नसतो. स्वप्निलची आत्महत्या आमच्या सर्वांसाठी दुःखाचा क्षण आहे. स्पर्धापरीक्षा भविष्यामध्ये पारदर्शकपणे कशा होतील, यासंदर्भात प्रयत्न करणार आहोत. टीका करणे हे भाजपचे काम आहे आम्ही त्यांच्या टीकेला घाबरणार नाही. महाविकास आघाडी सरकार समर्थपणे सरकार चालवत आहे.
भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी लोणकर कुटुंबीयांना दिलासा दिला. बहीण पूजा लोणकर तिच्या विवाहाची संपूर्ण जबाबदारी भाजपच्या वतीने उचलली. आमदार राहुल कुल यांनी स्वप्निलच्या मृत्यूबद्दल राज्यशासनाने पन्नास लाख रुपये नुकसानभरपाई स्वप्निलच्या कुटुंबाला द्यावी अशी मागणी केली. यावेळी गोपीचंद पडळकर म्हणाले की, सरकारच्या नाकर्तेपणामुळे स्वप्निल गमावला आहे. आता तरी सरकारला जाग आली पाहिजे. लवकरात लवकर स्पर्धापरीक्षा घेणे गरजेचे आहे.पूजाची नोकरीची जबाबदारी शासनाने घेणे गरजेचे आहे.
फोटो : केडगाव (ता. दौंड) येथे स्वप्निल लोणकरचे कुटुंबीय व आई छाया लोणकर यांना दिलासा देताना खासदार सुप्रिया सुळे, रमेश थोरात व मान्यवर.
(२) केडगाव भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर व आमदार राहुल कुल यांच्यासमोर अश्रूंना वाट करून देताना स्वप्निलचे वडील सुनील लोणकर