राष्ट्रवादीच्या दिग्गजांचे राजीनामे
By admin | Published: February 25, 2017 02:12 AM2017-02-25T02:12:58+5:302017-02-25T02:12:58+5:30
पुरंदर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या घरभेद्यांनी केलेल्या पक्षविरोधी कामामुळे बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादी काँग्रेस भुईसपाट झाली
गराडे : पुरंदर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या घरभेद्यांनी केलेल्या पक्षविरोधी कामामुळे बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादी काँग्रेस भुईसपाट झाली. निवडणूक लढविलेल्या जिल्हा परिषदेच्या ४ जागा व पंचायत समितीच्या ८ जागांवरील सर्व उमेदवार पराभूत होऊन पक्षाचे पुरते पानिपत झाले. निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारत पुणे जिल्हा बँकेचे संचालक प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरंदर तालुकाध्यक्ष शिवाजी पोमण व पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष योगेश फडतरे यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले असल्याची माहिती शिवाजी पोमण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी
पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, शिवाजी पोमण यांनी
पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जालिंदर कामठे व योगेश फडतरे
यांनी पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांच्याकडे आपापल्या पदाचे राजीनामे सादर केले.
२००९ व २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत, नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत पक्षातील काही गद्दार लोक पक्षातच राहून पक्षविरोधी कारवाया करीत विरोधकांना छुप्या किंवा वेळप्रसंगी उघड पद्धतीने सातत्याने मदत करतात. परिणामी पक्षाचे उमेदवार पराभूत होत असून बंडाळी माजत आहे.
या गद्दार नेत्यांवर व पदाधिकारी यांच्यावर कोणतीच कारवाई होत नसल्यामुळे ते निर्ढावलेले आहेत. पक्षाच्या ताकदीवर मोठे झालेले लोकच पक्षाला अडचणीत आणत आहेत. यांची पक्षनेतृत्वाने गंभीर दखल घेऊन तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी करीत राजीनामे दिले आहेत.(वार्ताहर)