पाणीकपात केल्यास फिरू देणार नाही, राष्ट्रवादीचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 02:36 AM2018-10-06T02:36:55+5:302018-10-06T02:37:25+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा : पुणेकरांचे हक्काचे पाणी
पुणे : शहराच्या पाणीकपातीबाबत पालकमंत्री व महापौर वेगवेगळी वक्तव्ये करत आहेत. त्यांच्यातच ताळमेळ दिसत नाही. पुणेकरांना हक्काचे पाणी मिळायला हवे. त्यामुळे आता सत्ताधाऱ्यांनी पाणीकपात करूनच दाखवावी, असे आव्हान महापालिकेतील विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी दिले आहे. पाणीकपात केल्यास पालकमंत्र्यांना शहरात फिरू देणार नाही, असा इशाराही तुपे यांनी दिला.
पाणीकपातीच्या मुद्यावर शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्यावतीने महापालिकेसमोर आंदोलन केले. या आंदोलनापूर्वी शिवसेनेने आंदोलन करून पाणीकपातीला विरोध केला. आंदोलनात तुपे यांच्यासह काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, गटनेते अरविंद शिंदे यांच्यासह नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसेनेच्या आंदोलनात शहरप्रमुख चंद्रकांत मोकाटे, नगरसेवक विशाल धनवडे, बाळा ओसवाल, संगीता ठोसर, श्वेता चव्हाण, अविनाश
साळवे, प्रमोद नाना भानगिरे, पल्लवी जावळे आदी सहभागी झाले होते.
काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी शिवसेनेच्या आंदोलनावर टीका केली. ते म्हणाले, ‘एकीकडे पाणीकपातीविरोधात शिवसेना आंदोलन करते, तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे विजय शिवतारे या खात्याचे मंत्री आहेत. मंत्र्यांच्या दालनात बसून पाणीकपात रद्द करण्याची हिंमत शिवसेनेने दाखवावी.’
पालकमंत्री गिरीश बापट पाणीकपात होणार नाही, असे सांगत आहेत, तर महापौर मुक्ता टिळक यांच्याकडून पाणीकपात होणारच, असे सांगितले जाते. दोघांमध्ये ताळमेळ दिसत नाही. यामध्ये नेमके खोटे कोण बोलत आहे. त्यांना सत्ता राबविता येत नाही. त्यामुळे आम्ही त्यांना आव्हान देतो. त्यांनी पाणीकपात करूनच दाखवावी. त्यांना शहरात फिरू देणार नाही.
- चेतन तुपे
/>