पुणे महानगरपालिकेतील २०२२ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच सत्तेत येणार, आत्तापासूनच पक्षाचे काम जनतेपर्यंत पोहोचवणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 05:34 PM2021-06-10T17:34:43+5:302021-06-10T17:45:14+5:30
सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाकडून मोठ्या प्रमाणात पैशांचा गैरवापर
पुणे: पुणे महानगरपालिकेची निवडणूक पुढच्या वर्षी होणार आहे. पालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवणे हेच पक्षाचे लक्ष्य असणार आहे. त्यादृष्टीने सर्व पदाधिकारी जोमाने कामालाही लागले आहेत. आता पालिकेत सत्ताधारी पक्ष म्ह्णून कार्यरत असणाऱ्या भाजपच्या चुकीच्या बाबींवर बोट ठेवत राष्ट्रवादी आपले काम जनतेपर्यंत पोहोवणार असून विजय मिळवल्याशिवाय मागे हटणार नाही. पुणे महानगरपालिकेतील २०२२ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच सत्तेत येणार. असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी व्यक्त केला.
सध्या सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाकडून मोठ्या प्रमाणात पैशांचा गैरवापर करण्यात आला. पक्षाचे काही सदस्य फोडण्यात आले. तरीही राष्ट्रवादी काँग्रेसला ४२ जागा मिळाल्या. ही आपल्यासाठी जमेचीच बाजू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या २२ व्या वर्धापनदिनानिमित्त पक्ष कार्यालयासमोर झालेल्या कार्यक्रमात जगताप बोलत होते. यावेळी खासदार वंदना चव्हाण, पक्षाचे नेते अंकुश काकडे, रवींद्र अण्णा माळवदकर, महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, ज्येष्ठ नगरसेवक बाबुराव चांदेरे, दीपक मानकर, पक्षाचे आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
२०१७ पासून आलेख उंचावला आहे. २०१२२ ला थेट महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा
पुणे हे शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचे शहर आहे. २०१७ च्या महानगरपालिका निवडणुकीचा अपवाद वगळता पक्षाच्या स्थापनेपासून शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचा आलेख उंचावताच राहिला आहे. अजित पवार ज्या-ज्या वेळी पुण्याचे पालकमंत्री राहिले आहेत, तेव्हा महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस सत्ताधारी राहिला आहे. सध्याही ते पालकमंत्री असून, कोणत्याही परिस्थितीत २०२२ च्या महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असेल असे त्यांनी सांगितले.