जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांच्या घरासमोरील खेकडे पोलिसांत सादर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2019 03:53 PM2019-07-09T15:53:03+5:302019-07-09T16:04:04+5:30
रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटून झालेल्या हानीला खेकडे जबाबदार असल्याचा अजब दावा जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांनी केला होता.
पुणे : रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटून झालेल्या हानीला खेकडे जबाबदार असल्याचा अजब दावा जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांनी केला होता. त्यावर आता प्रतिक्रिया येत असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी तर त्यांच्या घरासमोर असलेले खेकडे पकडून पोलिसांकडे सादर केले. ज्याप्रमाणे खेकड्यांनी तिवरे धरण फोडले त्याप्रमाणे ते सावंत यांचे घर पाडत होते असा दावा करत या महिलांनी भारती विद्यापीठ पोलिसांना हे खेकडे ताब्यात दिले.
याबाबत अधिक माहिती अशी की, २ जुलै रोजी रात्री तिवरे धरण फुटून अनेक निष्पापांचे जीव गेले आहेत. यात कोट्यवधींच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या घटनेमागे खेकडे असून त्यांनी धरण फोडल्याचा दावा सावंत यांनी केला होता. त्यावर अनेकांनी प्रतिवाद केला असून सावंत यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली गेली होती. पुण्यातही राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा रुपाली चाकणकर आणि कार्यकर्त्यांनी सावंत यांच्या कात्रज येथे असलेल्या घरी जाऊन खेकडे पकडले. हे खेकडे पकडून पोलिसांना दिले आणि त्यातून सावंत यांचे घर पोखरण्यापासून वाचवल्याचा दावाही केला.
याबाबत चाकणकर म्हणाल्या की, तिवरे धरण फोडल्यानंतर हे खेकडे मंञ्यांचे घर देखील फोडु लागलेत,त्यामुळे तातडीने या खेकड्यांवर 302चा गुन्हा दाखल करावा. आज खेकड्यांच्या घर पोखरण्यामुळे तानाजी सावंत व त्यांचे कुटुंबीय यांच्या जीवाला धोका होता पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या कार्यकर्तांच्या सतर्कतेमुळेच आज यांचे जीव वाचले. जर खेकडे धरण फोडत असतील तर घरही पोखरू शकतात त्यामुळेच राष्ट्रवादीने हे पाऊल उचलले.