राष्ट्रवादीला सर्वाधिक फटका
By admin | Published: November 10, 2016 01:13 AM2016-11-10T01:13:08+5:302016-11-10T01:13:08+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशाला पायबंद घालण्यासाठी घेतलेल्या धाडसी निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे.
पिंपरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशाला पायबंद घालण्यासाठी घेतलेल्या धाडसी निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे. हा निर्णय सामान्यांच्या दृष्टीने हितकारक आहे. दडवून ठेवलेला काळा पैसा बाहेर आल्यावर सामान्य जनतेसाठी कल्याणकारी निधी म्हणून तो उपयोगात येणार आहे. भ्रष्ट मार्गाने मिळविलेल्या काळ्या पैशाच्या बळावर महापालिका निवडणूक लढण्याची तयारी करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला या निर्णयाचा सर्वाधिक फटका बसणार असल्याचे मत खासदार अमर साबळे यांनी व्यक्त केले.
खासदार साबळे म्हणाले, ‘‘गतवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १२५वा जयंती महोत्सव असल्याने ‘समता वर्ष ’साजरे केले होते. केंद्र सरकारने हे वर्ष दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दीनिमित्त दलित कल्याण वर्ष म्हणून जाहीर केले आहे. मोदींनी घेतलेल्या निर्णयामुळे दलित, दीन-दुबळे, उपेक्षित यांच्या कल्याणासाठी चालना मिळणार आहे. मोदी सरकारचे हे ऐतिहासिक पाऊल आहे. स्वातंत्र्योत्तर काळात अन्य कोणत्याही सरकारने असा धाडसी निर्णय घेतलेला नाही. त्यामुळेच उपेक्षितांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारकडून वेगळे पाऊल उचलले आहे.
या निर्णयामुळे देशातील काळा पैसा व्यवहारात येऊन देशाच्या आर्थिक विकास दरात (जीडीपी) वाढ होईल. अतिरेकी कारवायांना पायबंद बसेल. ‘सब का साथ, सब का विकास’ हे धोरण ठेवून सामान्य नागरिकदेखील विकासाच्या प्रवाहात जोडला जाणार आहे. भाजपाने रीतसर निधी उभारला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत भ्रष्टाचार करून मिळविलेल्या काळ्या पैशातून पुन्हा सत्ता मिळवू, असा मस्तवालपणा ज्यांच्यात होता, त्या राष्ट्रवादी काँग्रेसला या निर्णयामुळे पायबंद बसेल, अशी टिप्पणीही साबळे यांनी केली.
पत्रकार परिषदेस माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे, महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस उमा खापरे, शहराध्यक्षा शैलजा मोळक, संघटन सरचिटणीस माऊली थोरात, प्रमोद निसळ उपस्थित होते.
(प्रतिनिधी)