राष्ट्रवादीचे युवा नेते रविराज तावरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:09 AM2021-06-01T04:09:38+5:302021-06-01T04:09:38+5:30
माळेगाव येथील घटना : दुचाकीवरून येत हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या लोकमत न्यूज नेटवर्क बारामती : माळेगाव बुद्रुक (ता. बारामती) येथे ...
माळेगाव येथील घटना : दुचाकीवरून येत हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या
लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : माळेगाव बुद्रुक (ता. बारामती) येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रविराज सदाशिवराव तावरे (वय ४०) यांच्यावर सोमवारी (दि. ३१) भर सायंकाळी दुचाकीवर आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केला. या घटनेनंतर तावरे यांना बारामती शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे माळेगावमध्ये खळबळ उडाली आहे.
रविराज तावरे हे त्यांची पत्नी जिल्हा परिषद सदस्या रोहिणी रविराज तावरे यांच्यासमवेत सायंकाळी पावणेसातच्या सुमारास येथील संभाजीनगरला वडापाव घेण्यासाठी आले होते. या वेळी वडापाव घेऊन त्यांनी संबंधित दुकानदाराचे पैसे दिले. त्यानंतर गाडीकडे येत असताना अचानक दुचाकीवर आलेल्या दोघा जणांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या घटनेनंतर तावरे खाली कोसळले, तर गाडीमध्ये बसलेल्या त्यांच्या पत्नी रोहिणी तावरे यांना अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे धक्का बसला. यातूनही त्यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे या परिसरात क्रिकेट खेळणारी मुले धावत आली. तोपर्यंत हल्लेखोरांनी गोळीबार करून पळ काढला होता.
जखमी अवस्थेतील तावरे यांना दादा जराड, मयूर भापकर, युवराज जेधे, आदेश डोंबाळे यांनी तातडीने मित्राच्या कारमधून बारामती येथील खासगी रुग्णालयात हलवले. त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी रुग्णालयात धाव घेतली आहे. तसेच या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली.
चौकट
रविराज तावरे हे माळेगाव परिसरातील बडे प्रस्थ म्हणून ओळखले जातात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांमध्ये त्यांची गणना होते. माळेगावातील राजकीय घडामोडींमध्ये रविराज यांची भूमिका निर्णायक ठरते. त्यामुळे आज त्यांच्यावर झालेल्या गोळीबाराबाबत वेगळीच चर्चा रंगत आहे.
—————————————————
...फायरिंगचा अवाज आला
माळेगाव कारखाना रस्त्यावरील झेलसिंग रस्त्यावर संभाजीनगर परिसर आहे. या ठिकाणी मुले क्रिकेट खेळत होती. या वेळी रविराज तावरे हे त्यांच्या कारमधून वडापाव घेण्यासाठी आले. वडापाव घेऊन त्याचे पैसे देऊन गाडीत बसत होते. या वेळी दुचाकीवर तोंड बांधून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यावे ळी ‘फायरिंग’चा आवाज आला. मात्र, येथील मुलांनी गाडीचा टायर फुटला असल्याचे समजून दुर्लक्ष केले. मात्र, तावरे यांच्या पत्नी ओरडल्याने मुलांसह ग्रामस्थांनी धाव घेतली.
————————————————
संशयित आरोपीच्या घराभोवती पोलीस बंदोबस्त
रविराज तावरे यांच्यावर गोळीबार करणाऱ्या संशयिताच्या घरी ग्रामीण पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. तावरे यांना बारामतीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. मात्र, हा गोळीबार कोणी व कशासाठी केला आहे, याचा अधिक तपास बारामती ग्रामीण पोलीस करीत आहेत.
फोटो ओळी :रविराज तावरे
३००५२०२१-बारामती-१५
————————————————