दिलीप मोहिते यांच्यावर दाखल गुन्हावरून राष्ट्रवादीच्या २७ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 08:47 PM2019-07-17T20:47:04+5:302019-07-17T20:49:19+5:30
खेड तालुक्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
पुणे : मराठा आरक्षणाची मागणी करताना माजी आमदार दिलीप मोहिते यांच्यावर पोलीस प्रशासनाकडून होणार खोट्या गुन्ह्यात असलेल्या कारवाईच्या निषेधार्थ जिल्हा परिषद, पंचायत समिती, व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे सामूहिक राजीनामे तालुका अध्यक्षांकडे सुपूर्द केले, अशी माहिती चाकण येथील बाजार समितीच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर व तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर यांनी दिली. त्यामुळे खेड तालुक्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
जिल्हा परिषद सदस्या निर्मलाताई पानसरे, दीपाली काळे, खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाळशेठ ठाकूर, उपसभापती सुगंधा शिंदे, बाजार समितीचे राष्ट्रवादीचे संचालक विलास कातोरे, नवनाथ होले, चंद्रकांत इंगवले, धैर्यशील पानसरे, अशोक राक्षे, धारू गवारी, सुरेखा टोपे, विठ्ठल वनघरे, विनायक घुमटकर, राजूभाई काझी, सयाजी मोहिते हे १३ संचालक, पंचायत समितीचे अरुण चौधरींसह चार सदस्य, चाकण नगर परिषदेचे विरोधीपक्ष नेते जीवन सोनवणे, नगरसेवक वृषाली देशमुख, मेनका बनकर, स्नेहा भुजबळ, अनिता कौटकर, संगीता बिरदवडे, अश्विता कुऱ्हाडे, प्रकाश भुजबळ या २७ पदाधिकाऱ्यांनी सामूहिक रित्या आपापल्या पदाचे राजीनामे तालुका अध्यक्षांकडे दिले आहेत.
यावेळी प्रदीप गारटकर म्हणाले, “मागील वर्षी दि. ३० जुलै २०१८ रोजी चाकण मराठा मोर्चाचे आंदोलन झाले, त्या मोर्चात काही समाज कंटकांनी याला हिंसक वळण दिले. गेल्या एक वर्षांपासून पोलीस प्रशासन याचा तपास करीत आहे. दिलीप मोहितेंना समाज कंटक म्हणून शोधून काढणे हे हास्यापद आहे. या मागे राजकारण असल्याचे प्रत्येक व्यक्ती खासगीत बोलत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभेत डॉ. अमोल कोल्हे निवडून आल्याने विरोधकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. एवढी अद्ययावत पोलीस यंत्रणा असताना नेमके विधान सभेच्या निवडणुकीच्या तोंडावरच हा तपास कसा पूर्ण झाला हा प्रश्न आहे. कार्यकर्त्यावर अन्याय होत असताना अन्यायाविरुद्ध लढण्याचे हे सकल मराठा समाजाचे काम आहे. त्यांच्यावर झालेल्या या अन्यायाचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस तीव्र निषेध करीत आहोत.”