राष्ट्रवादीचे आंदोलन म्हणजे स्टंटबाजी- आमदार राहुल कुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2019 12:40 AM2019-03-03T00:40:28+5:302019-03-03T00:40:32+5:30
पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांच्या बदलीच्या विरोधातील राष्ट्रवादीचे आंदोलन म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरील स्टंट आहे.
यवत : पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांच्या बदलीच्या विरोधातील राष्ट्रवादीचे आंदोलन म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरील स्टंट आहे. मात्र, सत्ता व पद जनतेच्या विकासासाठी असते, तर भांडगाव येथील भुयारी मार्ग व यवत येथील उड्डाण पूल रद्द करण्यासाठी सत्तेचा वापर कोणी केला, हे जनतेला माहीत आहे, असा प्रत्यारोप आमदार कुल यांनी केली.
पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांच्या बदलीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने मोर्चा काढून जाहीर सभेतून अनेक गंभीर आरोप आमदार राहुल कुल यांचे नाव न घेता केले. याबाबत आमदार राहुल कुल यांनी सर्व आरोपांचा खुलासा केला. निवडणुकीच्या तोंडावर जनतेला जातीपातीमध्ये अडकवीत तालुक्यातील चांगल्या कामांपासून लक्ष विचलित करण्यासाठी केलेली खेळी असल्याचे कुल म्हणाले. अधिकाऱ्यांच्या बदल्या मनमानी पद्धतीने करण्यासाठी आताचे सरकार काही राष्ट्रवादी काँग्रेसचे नाही. तत्कालीन पोलीस निरीक्षक बंडगर यांच्या बदलीशी माझा कसलाही संबंध नाही. ते रुजू होताना किंवा बदलून जाताना कधीही मला भेटले नाहीत. नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक अद्यापपर्यंत आपल्याला भेटलेलेच नाहीत. विरोधक हे मला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यातील मी ताईत आहे, असे म्हणत आहेत; पण मुख्यमंत्र्यांच्या जवळ असल्याचा फायदा मी दौंडच्या विकासकामांसाठी करून घेत आहे, असेही कुल यांनी सांगितले.
>विकासकामांच्या बाबत सामोरा समोर चर्चेचे आव्हान न स्वीकारणारे आता निवडणुकीच्या तोंडावर स्टंटबाजी करत आहेत. विकासकामांसाठी १२०० कोटींपेक्षा जास्तीचा आणि थोरात यांच्यापेक्षा चौपट निधी आणला; मात्र विकासकामांवर बोलण्यापेक्षा तालुक्यातील जनतेला फसविण्याचे काम अजूनही विरोधक करत आहेत. मात्र, तालुक्यातील जनता सुज्ञ असल्याने जनता यांना चांगलीच ओळखत असल्याचे कुल म्हणाले.