शहरात प्रभाव टाकण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न
By admin | Published: September 28, 2016 04:51 AM2016-09-28T04:51:52+5:302016-09-28T04:51:52+5:30
पक्षाचे वर्चस्व नसलेल्या शहराच्या मध्य भागात चंचुप्रवेश करायचा, या विचाराने राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोर्चेबांधणी केली जात आहे. पेठांमधील मतदारांना प्रभावित करण्यावर राष्ट्रवादीकडून
पुणे : पक्षाचे वर्चस्व नसलेल्या शहराच्या मध्य भागात चंचुप्रवेश करायचा, या विचाराने राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोर्चेबांधणी केली जात आहे. पेठांमधील मतदारांना प्रभावित करण्यावर राष्ट्रवादीकडून भर दिला जात असून, त्यासाठी कार्यकर्ते प्रशिक्षित करण्यात येत आहेत. कोथरूड, कसबा व पर्वती या विधानसभा मतदारसंघांवर पक्षाने लक्ष केंद्रित केले असल्याचे दिसते.
पक्षाचे पालिकेतील पदाधिकारी, काही नगरसेवक यांचा विरोध डावलून शहराध्यक्षपदी खासदार वंदना चव्हाण यांची पुनर्नियुक्ती करणे ही याची पहिली पायरी होती. आता दुसऱ्या टप्प्यात प्रशिक्षित कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या परिसरातील मतदारांपर्यंत पोहोचण्याचे पक्षाचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या सुरू असलेल्या कार्यशाळा हा त्याचाच भाग आहे. या कार्यशाळांना ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य, महिला चळवळीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ, युक्रांदचे संस्थांपक कुमार सप्तर्षी यांच्यासारख्या नामवंतांना निमंत्रित करण्यात येते. त्यांची विविध विषयांवर कार्यशाळेत व्याख्याने होतात. या प्रशिक्षित कार्यकर्त्यांकडून थेट मतदारांपर्यंत पोहोचण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर, धर्मनिरपेक्ष विचाराच्या मतदारांमध्ये यामुळे पक्षाविषयी सहानुभूती निर्माण होईल, असाही हेतू त्यामागे आहे. संघटना स्तरावरून याची आखणी करण्यात येत असून, पक्षनेतृत्वाने त्यासाठी त्यांना मोकळीक दिली आहे.
पक्षाने केलेल्या विकासकामांना फेसबुक, व्हॉट्सअॅप, टिष्ट्वटर अशा माध्यमांमध्ये आवर्जून स्थान द्यावे अशा सूचना या कार्यशाळांमधून कार्यकर्त्यांना देण्यात येत असतात. तसे केले जात आहे किंवा नाही, याची माहितीही संघटनेत वरिष्ठ स्तरावरून घेतली जात असल्याचे समजते.
पेठांमध्ये गेली अनेक वर्षे भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व आहे. केंद्र व राज्यात त्यांची सत्ता असल्याने पालिकेतही सत्ता मिळविण्यासाठी ते आक्रमक झाले आहेत. त्यातूनच राष्ट्रवादी व मनसेच्या नगरसेवकांचे पक्षांतर घडवून आणण्यात आले. मात्र, भाजपाला उत्तर न देता शांतपणे त्यांच्या बालेकिल्ल्यात शिरून थेट मतदारांपर्यंत पोहोचावे, अशा प्रकारची रणनीती राष्ट्रवादी काँग्रेस राबवीत आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षण कार्यशाळांमधून हाच सल्ला दिला जात असल्याचे कार्यकर्ते खासगीत सांगतात. त्याचबरोबर, पक्षाचा उपनगरी तोंडवळा बदलून शहरी चेहरा मिळावा, यासाठीही प्रयत्न होताना दिसत आहेत. त्यासाठी पक्षसंघटनेतही जाणीवपूर्वक पेठांमध्ये राहणाऱ्या युवा कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे. नेत्यांशी नको तर मतदारांशी संपर्कात राहा, पक्षाने केलेली विकासकामे त्यांच्यापर्यंत पोहोचवा, त्यासाठी सोशल मीडियाचा वापर करा, असे त्यांना सांगण्यात येत आहे.
मागील सलग १० वर्षे पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे; मात्र एकदाही त्यांना स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. सुरुवातीला भाजपा-सेनेला बरोबर घेऊन नवा पॅटर्न करण्यात आला. त्यानंतर आता काँग्रेसला बरोबर घेऊन सत्ता राबविण्यात येत आहे. त्याची खंत वाटत असल्यानेच या वेळी एकहाती सत्ता यावी, अशी जाहीर अपेक्षा पक्षनेतृत्वाने व्यक्त केली. शहराच्या मध्य भागातील नगरसेवकांची संख्या वाढल्याशिवाय ते शक्य नाही. पक्षाने सत्तेच्या गेल्या १० वर्षांत केलेली विकासकामे थेट मतदारांपर्यंत पोहोचवली तर ते शक्य असल्याच्या विचारातून कार्यकर्त्यांना सोशल मीडियाच्या वापराचेही खास प्रशिक्षण देण्यात आले आहे.