"धोरण मोदींचे,मरण सर्वसामान्यांचे..." ; इंधन दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचं 'चूलभाकरी' आंदोलन 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2021 06:23 PM2021-07-03T18:23:27+5:302021-07-03T18:24:09+5:30

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या दरवाढीचा आलेख चढताच राहिला आहे.

NCP's 'Choolbhakari' protest against fuel price hike in pune | "धोरण मोदींचे,मरण सर्वसामान्यांचे..." ; इंधन दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचं 'चूलभाकरी' आंदोलन 

"धोरण मोदींचे,मरण सर्वसामान्यांचे..." ; इंधन दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचं 'चूलभाकरी' आंदोलन 

Next

पुणे : देशात पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या दरवाढीने विक्रमी उच्चांक गाठत नवा विक्रम केला आहे. इंधनवाढीच्या मुद्द्यांवरून काँग्रेससह विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारवर सातत्याने वेगवेगळी आंदोलनं, मोर्चे, ट्विट यांद्वारे सडकून टीका करण्यात येत असते. आधीच कोरोना महामारीमुळे आर्थिक अडचणीत आलेल्या सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा सामना करावा लागत आहे. केंद्र सरकारकडून सातत्याने होत असलेल्या इंधनदरवाढीचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत जोरदार घोषणाबाजी करत चुलभाकरी आंदोलन केले.

पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किंमतीत सतत दरवाढीच्या निषेधार्थ पुण्यातील बालगंधर्व चौकात शनिवारी (दि.३) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने चुलीवर भाकरी करत आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नही चाहिये अच्छे दिन; लौटा दो हमारे बुरे दिन, वाढलेला गॅस, कोंडतोय सर्वसामान्यांचा श्वास, धोरण मोदींचे, मरण सर्वसामान्यांचे यांसारख्या जोरदार घोषणाबाजी केली. 

आंदोलनाबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, केंद्र सरकार पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरात सातत्याने वाढ करत आहे. यामुळे सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले असून त्यांचे जगणे मुश्किल झाले आहे. त्याचा निषेध म्हणून आम्ही हे आंदोलन करत आहोत. मात्र, केंद्र सरकारने जर आंदोलनाची दखल सरकारने घेतली नाहीतर आगामी काळात इंधन दरवाढीविरोधातील आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा देखील जगतापांनी यावेळी दिला.

घरगुती गॅसच्या किमतीत नुकतीच २५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. काँग्रेसप्रणित युपीए सरकारच्या काळात ३२४ रुपये दर असणाऱ्या गॅस सिलेंडरच्या  किमतीत गेल्या सात वर्षात उच्चांकी वाढ झाली असून ती ९०० रुपये इतकी झाली आहे. ही दरवाढ सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावर मोठा परिणाम करणारी असल्याचेही जगताप यांनी यावेळी सांगितले. 

तामिळनाडू, ओरिसा, पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, पुद्दुचेरी अशा पाच राज्यांच्या निवडणूक पार पडल्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा आलेख चढताच राहिला आहे. जून महिन्यात १६ वी दरवाढ नोंदविण्यात आली होती. 

Web Title: NCP's 'Choolbhakari' protest against fuel price hike in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.