राष्ट्रवादीची पुणेकरांसाठी 'लयभारी' स्पर्धा; 'या'चा सेल्फी किंवा व्हिडिओ पाठवा अन् ११ हजार १११ रुपये मिळवा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 03:10 PM2021-08-17T15:10:00+5:302021-08-17T15:11:54+5:30
पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या निवडणुका अगदी काही महिन्यांवरून येऊन ठेपल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ताधारी भाजपला आव्हान दिले आहे.
पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या निवडणुका अगदी काही महिन्यांवरून येऊन ठेपल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात विकास कामांवरून होणाऱ्या आरोप - प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. तसेच शहरात काही दिवसांपूर्वी भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत जोरदार 'होर्डिंग वॉर' देखील पाहायला मिळाले होते. मात्र, आता महापालिकेतील विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने ''विकासाची पोलखोल स्पर्धा" आयोजित करत सत्ताधारी भाजपसमोर आव्हान दिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून 'विकासाची पोलखोल' या स्पर्धा जाहीर केली आहे. शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी या स्पर्धेची घोषणा केली आहे. यामध्ये पुण्यातील नागरिकांनी व्हिडिओ आणि सेल्फी फोटो पोस्ट करणार्या विजेत्या स्पर्धकास बक्षीसं देखील दिली जाणार आहेत. आपल्या भागातील समस्येचा फोटो किंवा व्हिडिओ संबधित व्यक्तीने #polkholpune या हॅशटॅगवर पोस्ट करायचा आहे. या स्पर्धेत विजेत्यांना प्रत्येकी ११,१११ रुपये असे बक्षीस दिले जाणार आहे.
पुणे शहरातील विविध खड्डे, कचरा, यांसारख्या ज्वलंत प्रश्नांसह विकास कामांच्या पूर्ततेसाठी अनेकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आंदोलने करण्यात येत असतात. मात्र, तरीदेखील अनेक समस्यांबाबत जैसे थे अशी परिस्थिती पाहायला मिळते. महापालिकेतील सत्ताधारी पक्ष असणाऱ्या भाजपवर विकासकामांवरून टीकास्र सोडतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसने 'विकासाची पोलखोल' स्पर्धाच जाहीर केली आहे.
पुण्यात रंगलं होतं 'होर्डिंग वॉर'
पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राजकीय पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. पुण्यात फडणवीस आणि पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजप आणि राष्ट्रवादीकडून जोरदार 'पोस्टरबाजी' द्वारे शक्तिप्रदर्शन केल्याचे पाहायला मिळाले होते.