शिरूर बाजार समितीवर राष्ट्रवादीचाच झेंडा

By admin | Published: May 22, 2017 06:40 AM2017-05-22T06:40:18+5:302017-05-22T06:40:18+5:30

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने १७ पैकी १३ जागा जिंकून समितीवर विजयाचा झेंडा फडकवला.

NCP's flag on Shirur Market Committee | शिरूर बाजार समितीवर राष्ट्रवादीचाच झेंडा

शिरूर बाजार समितीवर राष्ट्रवादीचाच झेंडा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरूर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने १७ पैकी १३ जागा जिंकून समितीवर विजयाचा झेंडा फडकवला. आमदार बाबूराव पाचर्णे यांना मात्र आपल्या पराभवाची मालिका खंडित करण्यात यश आले नाही. आजचा आमचा विजय हा नैतिकतेचा; तसेच सर्वसामान्यांचा विजय असून, विधानसभेनंतर तालुकास्तरावर झालेल्या सर्व निवडणुकांत जनतेने आमदारांचा चांगलाच ढोल बडवला आहे, अशी प्रतिक्रिया माजी आमदार अ‍ॅड. अशोक पवार यांनी दिली.
आज सकाळी ९ ला मतमोजणीस प्रारंभ झाला. बॅलेट पेपरवर मतदान झाल्याने मतपत्रिकेची जुळवणी करण्यात बराच वेळ गेला. सर्वांत प्रथम व्यापारी मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवीण चोरडीया व सुदीप गुंदेचा हे अनुक्रमे ३४४ व २६८ मते मिळवून विजयी झाले.
यानंतर सोसायटी मतदारसंघाची मतमोजणी झाली. या मतदारसंघात अटीतटीची लढत झाल्याचे स्पष्ट झाले. शशिकांत दसगुडे यांना सर्वाधिक ९०८ मते मिळाली. प्रकाश पवार ८५२, शंकर जांभळकर ८१८, वसंत कोरेकर ७६१, विश्वास ढमढेरे ७५१ मते मिळवून राष्ट्रवादीच्या पॅनेलमधून विजयी झाले. भाजपा पॅनेलचे राहुल गवारी व संतोष मोरे हे अनुक्रमे ८१८ व ६७२ मते मिळवून विजयी झाले.
महिला मतदारसंघात भाजपाच्या (शेतकरी सहकार विकास पॅनेल) पॅनेलच्या छायाताई बेनके व राष्ट्रवादीच्या (शेतकरी विकास पॅनेल) पॅनेलच्या मंदाकिनी पवार या ८५७ व ७४९ मते मिळवून विजयी झाल्या. भटक्या विमुक्त मतदारसंघात राष्ट्रवादीचे सतीश कोळपे यांचा ९९ मतांनी विजय झाला. त्यांना ७७२, तर भाजपाच्या हेमंत पवार यांना ६७३ मते मिळाली. ओबीसी मतदारसंघात भाजपाच्या विकास शिवले यांचा २०२ मतांनी विजय झाला. त्यांना ८२४, तर राष्ट्रवादीच्या संदीप गायकवाड यांना ६२२ मते मिळाली.
ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघात राष्ट्रवादीचे मानसिंग पाचुंदकर व धैर्यशील मांढरे हे अनुक्रमे ६७९ व ४८० मते मिळवून विजयी झाले. तिसऱ्या क्रमांकावर असलेले अनिल नवले यांना ४४४ मते मिळाली, तर संभाजी कर्डिले यांना १८९ मतांवर समाधान मानावे लागले. ग्रामपंचायत अनुसूचित जाती प्रवर्गात राष्ट्रवादीचे विजेंद्र गद्रे यांनी भाजपाच्या तुकाराम थोरात यांचा ४३७ मतांनी पराभव केला. गद्रे यांना ६६९, तर थोरात यांना २३२ मते मिळाली.
निकालाचे चित्र स्पष्ट होताच राष्ट्रवादीच्या समर्थकांनी गुलाल उधळून व फटाके वाजवून एकच जल्लोष केला.
हमाल तोलारी मतदारसंघासाठी झालेल्या एकूण १४३ मतदानापैकी बंडू जाधव यांना ७०, तर विरोधी भाजपा पॅनेलचे कुंडलिक दसगुडे यांना ६९ मते मिळाली. यात चार मते बाद झाली. मात्र, एका बाद मतावर भाजपाने हरकत घेतली.
यावरून राष्ट्रवादी व भाजपाच्या कार्यकर्त्यांत शाब्दिक चकमक उडाली. राष्ट्रवादीचे मानसिंग पाचुंदकर यांनी बाद झालेले मत योग्य असल्याचे ठासून सांगितले. वाद वाढल्याने हा निकाल राखीव ठेवण्यात आला. भाजपाने फेर मतमोजणीची मागणी केली. फेरमतमोजणीत आहे तशीच परिस्थिती राहिल्याने निवडणूक निर्णय अधिकारी सुनंदा जाधव यांनी जाधव यांना विजयी घोषित केले.

Web Title: NCP's flag on Shirur Market Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.