राष्ट्रवादीत खदखद

By admin | Published: August 28, 2014 04:09 AM2014-08-28T04:09:20+5:302014-08-28T04:09:20+5:30

राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने मुंबईत घेण्यात आलेल्या इच्छुकांच्या मुलाखतीदरम्यान पक्षातील खदखद बाहेर आली.

NCP's Khadkhad | राष्ट्रवादीत खदखद

राष्ट्रवादीत खदखद

Next

पुणे : राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने मुंबईत घेण्यात आलेल्या इच्छुकांच्या मुलाखतीदरम्यान पक्षातील खदखद बाहेर आली. विशेष म्हणजे प्रथमच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात शरद पवार यांच्यासमोर तक्रारी करण्यात आल्या. लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे विश्लेषण करताना ज्येष्ठ नेत्यांनाही कार्यकर्त्यांनीच धारेवर धरले.
पुणे जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत झाल्या. जिल्ह्यातून तब्बल ७६ इच्छुक असल्याने मुलाखतीदरम्यान तणावच निर्माण झाला होता.
शिरूर-हवेलीतील इच्छुक मंगलदास बांदल यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी तक्रार केली. दादाच आम्हाला गुंड म्हणत असतील तर लोक काय म्हणणार? असा सवाल बांदल यांनी केला. बांदल यांना अडवू पाहणाऱ्या प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनाही बांदल यांनी फटकारले.
जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांतील इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. अन्य इच्छुकांविषयी काही बोलायचे नाही, केवळ आपल्याविषयी बोलायचे, अशा सूचना किंवा अलिखित नियम असल्याने बहुसंख्य इच्छुकांनी आपापलीच माहिती सांगावी, असे वारंवार सांगण्यात येत होते. मात्र, तरीही खेडमधील काही कार्यकर्ते सभागृहाबाहेर दिलीप मोहिते यांच्या नावाने घोषणा देत होते. या तालुक्यातील मोहितेविरोधकांनी परिवर्तन आघाडी केली आहे. या आघाडीचे सदस्य शरद बुट्टे पाटील, सुरेश गोरे आदींनीही मुलाखती दिल्या. नवनाथ काकडे या इच्छुकाने तर
‘ भाकरी फिरवा’ अशी मागणी केली. खेड व शिरूरमधील मुलाखती एकाच वेळी घेण्यात आल्या. हवेली शिरूरचे आमदार अशोक पवार यांनी आपण विद्यमान आमदार असल्याने आपल्याला उमेदवारी द्यावी, अशी विनंती केली.
इंदापुरात एका बाजूला महाआघाडीच्या माध्यमातून सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याविरोधात लढण्याची तयारी केली आहे. मात्र, लढायचे कोणी? याबाबतही वाद असल्याचे मुलाखतीदरम्यान उघड झाले. दत्तात्रय भरणे यांच्याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस प्रदीप गारटकर, छत्रपती कारखान्याचे माजी संचालक भाऊसाहेब सपकाळ हे देखील मुंबईला गेले होते. मात्र, पक्षाकडे उमेदवारी भरणे यांनीच मागितली. राष्ट्रवादीतच या निमित्ताने दोन गट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गारटकरसमर्थकांनी गारटकर यांच्यावर पक्ष अन्याय करत आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
दौंड तालुक्यातील कुल-थोरात गटाच्या वादात कुल गट राष्ट्रवादीतून वेगळा झाल्याचे चित्रही दिसून आले. आमदार रमेश थोरात यांच्याबरोबर आप्पासाहेब पवार, वीरधवल जगदाळे यांनी उमेदवारीची मागणी केली होती. मात्र, तिघांनीही पक्ष घेईल तो निर्णय मान्य केला जाईल, असे सांगितले. ‘भीमा-पाटस’चे अध्यक्ष राहुल कुल मुलाखतीसाठी गेलेच नाहीत.
पुरंदर तालुक्यातून १८ जण मुलाखतीसाठी गेले होते. सर्वांना एकाच वेळी मुलाखतीसाठी बोलाविण्यात आले. ‘पक्ष देईल त्या उमेदवाराला निवडून आणू’ असे या इच्छुकांनी मुलाखतीदरम्यान सांगितले. (वार्ताहर)

Web Title: NCP's Khadkhad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.